वरवंड : चौफुला येथे जगद्गुरू संत तुकाराम महाराज संस्थानतर्फे संत बाळूमामांच्या बग्गा क्रमांक १५ चा सेवाभाव तुकोबारायांच्या चरणी समर्पित करण्यात आला. मेंढ्यांच्या रिंगणाने भक्तिरसाचा आविष्कार घडविला. त्यानंतर वरवंड येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरासमोर मंगळवारी सायंकाळी सव्वासात वाजता पालखी सोहळ्याचा वैभवशाली दळभार पोचला. मंदिराभोवतीची फुलांच्या पायघड्या, नामघोषाचा गजर अशा भक्तिमय वातावरणात सोहळा वरवंड येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या प्रांगणात मुक्कामी विसावला.
पालखी सोहळ्यात अग्रभागी चौघडा वाजत मार्गक्रमण झाले. त्यांच्या मागोमाग देवाचा अश्व आणि घोडेस्वार होते. त्यानंतर सव्वीस दिंड्यांचा समावेश होता. नामदेव गिराम चोपदार आणि इतर चोपदारांनी पताकाधारी टाळकरी वारकऱ्यांची व्यवस्था केली. या साऱ्या वातावरणात मंदिराचा परिसर विठुरायाच्या नामघोषाने आणि फुलांच्या सुगंधाने भरून गेला. पुंडलिक महाराज देहूकर यांनी ध्वनिक्षेपकावरून ‘तुकाराम तुकाराम’ असा लयबद्ध जयघोष सुरू केला. जयघोष करत दिंड्या मंदिरात प्रवेश करत होत्या. मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गावर व मंदिराच्या आत फुलांच्या पायघड्यांमुळे सारा परिसर सुगंधमय झाला.
‘ही माझी मिराशी। ठाव तुझ्या पायांपाशीं। याचा धरीन अभिमान। करीन आपुलें जतन।। या अभंगाने समाज आरतीला सुरुवात झाली. त्यानंतर चोपदारांनी सूचना दिल्या आणि ‘ज्ञानदेव-तुकाराम’ नामघोषात आरतीचा समारोप झाला. गावकऱ्यांनी वारकऱ्यांची मनोभावे सेवा केली.
मेंढ्यांचे रिंगणजगद्गुरू संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे, सोहळा प्रमुख व विश्वस्त तसेच देहूकर ग्रामस्थ यांच्याकडे मेंढ्यांच्या रिंगणासाठी बाळूमामा देवस्थानचा बग्गा क्रमांक १५ आणि ग्रामस्थांनी विनंती केली. या मागणीला संस्थानने मान्यता दिल्याने अनोख्या रिंगणाचा समारंभ पार पडला. त्यामुळेच पहिल्यांदाच चौफुला येथे पालखी रथाभोवती मेंढ्यांनी रिंगण घातले. वारकरी सांप्रदायातील प्रदक्षिणा पूर्ण केली. रिंगण सुरू असताना संत तुकोबाराय व संत बाळूमामा यांच्या जयघोष भाविकांनी केला.
दृष्टिक्षेपात...पहाटे साडेसहा वाजता पादुकांना अभिषेक सुरू असताना पावसाचा शिडकावा
उन्हाची तिरीप जाणवू लागली, कुठे ढगाळ वातावरण तर कुठे ऊन-सावल्यांचा खेळ रंगला
भांडगावात ग्रामस्थांनी पालखी खांद्यावर घेऊन श्रीविठ्ठल मंदिरात नेऊन पिठलं-भाकरीचा नैवेद्य दाखवला
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.