मुंबई : सांगलीतील (Sangli) ज्येष्ठ धनगर नेते आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांचे समर्थक माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी आज भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत अण्णासाहेब डांगे यांच्यासह त्यांच्या दोन्ही मुलांचा भाजप प्रवेश झाला. सुपुत्र चिमण डांगे आणि विश्वनाथ डांगे यांचेही भाजपात (BJP) स्वागत करण्यात आले. विशेष म्हणजे आरएसएसच्या मुशीत तयार झालेले आणि शिवसेना-भाजप युतीमध्ये मंत्री राहिलेल्या अण्णासाहेब डांगे हे 23 वर्षांनी स्वगृही परतल्याचे दिसून येत आहे. भाजपमध्ये असताना दिवंगत गोपीनाथ मुंडेच्या शिफारसीवरुन त्यांना मंत्रीपद मिळाले होते. या पक्षप्रवेश सोहळ्यावेळी देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) डांगे यांच्या जुन्या काळातील राजकीय आठवणींना उजाळा दिला.
अण्णासाहेब डांगे यांनी यापूर्वी राज्यात काँग्रेसला सत्तेपासून रोखण्यात युतीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत त्यांचे नेतृत्व तयार झाले होते, नंतरच्या काळात महाविकास आघाडी सरकार असताना त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्या नेतृत्वात त्यांनी घड्याळ हाती बांधलं होतं. मात्र, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी आता ते पुन्हा भारतीय जनता पार्टीमध्ये परतत आहेत.
आजचा दिवस माझ्या भाग्याचा दिवस आहे, 20 मार्च 2002 ला मी पक्षाचा राजीनामा दिला होता. आता जे हयात नाही यांच्याबद्दल बरं वाईट बोलणं बरोबर नाही. पक्षांमध्ये चुरस निर्माण झाली आहे. अटलजींनी नाव घेतलं, प्रमोद महाजन उत्तर अधिकारी होतील आणि गोपीनाथ मुंडे यांना मुख्यमंत्री करायचं होतं म्हणून माझ्यावर अन्याय झाल्याची भावना यावेळी अण्णासाहेब डांगे यांनी बोलून दाखवली. तिथून माझी पिळवणूक चालू झाली, गोपीनाथ मुंडे आणि मी खूप जवळचे मित्र. पण, नाईलाजाने मला पक्ष सोडायला लागला. शरद पवार एकदा एका व्यक्तीला बोलले होते की, अण्णांसोबत माणसं आता राहिली नाहीत. या वाक्यामुळे मी पक्षातून निष्क्रिय झालो, असेही डांगेंनी पक्षप्रवेशावेळी म्हटलं.
मी देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो, या दिवसाची वाट 8000 दिवसांपासून मी बघतोय. 23 वर्षे आम्ही भाजपापासून दूर होतो पण आमचा कोणी विचार केला नाही. पण तुम्ही आला आणि आमचा विचार केला. तुमच्यामुळे मला आज हा दिवस बघायला मिळाला, असे म्हणत अण्णासाहेब यांचे चिरंजीव चिमण डांगे यांनी मनातील भावना बोलून दाखवल्या. मुख्यमंत्री आपल्या वडिलांनी आणि आप्पांनी देखील एकत्र काम केले आहे, आमच्याकडून कधीही पक्षाशी गद्दारी होणार नाही हे आश्वासन आम्ही देतो. माझी एकच मागणी आहे, उरुण ईश्वरपुर असं नाव कृपया करा असेही चिमण यांनी म्हटले.
आमच्या सर्वांसाठी आज आनंदाचा दिवस आहे, अण्णांनी पक्ष वाढवण्यासाठी मोठं काम केलं, त्यांचा मोठा वाटा या सगळ्यामध्ये आहे. आम्ही लहान कार्यकर्ते असल्यापासून प्रमोदजी, गोपीनाथजी अण्णा या सगळ्यांनी खूप कष्टातून या पक्षाला मोठा केलं आणि शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवलं. अण्णांनी महत्त्वाचे वर्ष हे जनसंघासाठी आणि भारतीय जनता पार्टीसाठी दिले. मी महापौर असताना अण्णांनी जी घोषणा केली, टँकरमुक्त महाराष्ट्र त्यावेळेस मला अण्णांबरोबर काम करायची संधी मिळाल्याची आठवण मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितली. आम्ही युवा मोर्चाचे लहान कार्यकर्ते असताना मी बघायचो अण्णांचं स्थान खूप मोठं होतं, गोपीनाथजी पण अण्णांबरोबर चर्चा करून मग निर्णय घ्यायचे. माझे संघ जीवन गाथा हे पुस्तक अण्णांनी लिहिलं, प्रकाशनाला मी देखील उपस्थित होतो, अशीही आठवण फडणवीसांनी सांगितली.
डांगे कुटुंबाच्या भाजप प्रवेशावर राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माणसे फुटत असतील तर ते माणसे फोडणारच, ज्यांना जायचे ते जातील आणि ज्यांना माझ्याबरोबर थांबायचे ते थांबतील, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली. अण्णासाहेब डांगे, चिमण डांगे आणि विश्वनाथ डांगे यांचा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत आज भाजप प्रवेश झाला.
तुळजाभवानी मंदिरात 10 दिवस गाभाऱ्यातील दर्शन बंद; मंदिर समितीचा निर्णय, भाविकांना केवळ मुखदर्शन
आणखी वाचा
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.