रांची : परिस्थितीशी दोनहात करत संघर्षाच्या वाटेवरुन चालताना मिळवलेलं यश हे अभिमानाचं आणि तितक्याचं कौतुकाचं ठरतं. गेल्या काही वर्षात अशा अनेक सक्सेस स्टोऱ्या आपण पाहिल्या आहेत, वाचल्या आहेत, ज्यांतून सर्वसामान्य आणि गरिबांची मुलेही मोठमोठी स्वप्ने पाहू लागली. रिक्षावाल्याचं पोरगं कलेक्टर बनलं, शेतकऱ्याचा लेक तहसीलदार झाला, अशा बातम्या आपण पाहिल्या आहेत. आता, झारखंडमधून अशीच एक प्रेरणादायी यशस्वी सत्यकथा समोर आली आहे. लेक जेपीएससी परीक्षा (Exam) पास झाल्यानंतर पेढे वाटायला पैसे नसल्याने आईने साखर देऊन मुलीचं तोंड गोड केलं. झारखंडच्या (Jharkhand) आदिवासी भागातील बबिता पहाडिया आणि सूरज यादवचं यश हे देशातील गरिब घरातील लाखोंना प्रेरणा देणारे आहे.
झारखंडमधील पहाडिया म्हणजेच आदिवासी भागातील नागरिकांचा उदरनिर्वाह मुख्यत्वे शेती, शिकार आणि जंगलातून मिळणाऱ्या साधनसामुग्रीवरच चालतो. याच आदिवासी समाजातील एका युवतीने अधिकारी होण्याचं स्वप्न पाहिलं, संकटांच्या डोंगरांवर चढाई करत बबिताने अखेर झारखंड लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण करत देदीप्यमान यश मिळवलं, तिचं हे यश हजारो आदिवासी युवकांपुढे नवा आदर्श निर्माण करणारं ठरलं आहे. बबिताचे वडिल एका खासगी शाळेत शिपाई तर आई गृहिणी आहे. तिचा भाऊ एका पोस्ट कार्यालयात कामाला, अशा संघर्ष पाचवीला पूजलेल्या कुटुंबातून बबिताने अधिकारी होण्याचं स्वप्न पाहत प्रवास सुरू केला.
घरात चार भावंड असल्याने वडिलांनी बिबिताला लग्न करण्याचा सल्ला दिला. मात्र, वडिलांच्या निर्णयाला विरोध करत तिने अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगले. अखेर लेकीच्या हट्टापुढे कुटुंबीयांनी माघार घेत, बबिताच्या लहान बहिणीचे लग्न लावून दिले. जोपर्यंत सरकारी नोकरी मिळवत नाही, तोपर्यंत लग्न करणार नाही, असा प्रणच बबिताने घेतला होता. त्यामुळे, समाजातून तिला टोमणेही मिळायचे, बोलणेही ऐकावे लागायचे. मात्र, बबिताने आपल्या जिद्द व मेहनतीने अखेर यश मिळवलं. जेपीएससी परीक्षेत राज्यात 337 वा क्रमांक मिळवत ती अधिकारी बनली. 25 जुलै रोजी जेपीएससी परीक्षेचा निकाल लागला अन् बबिताच्या घरात आनंदोत्सव साजरा झाला. मात्र, या आनंदी क्षणातही कुटुबीयांच्या हालाकीच्या परिस्थितीचं गोड रुप सर्वांना पाहायला मिळालं. लेक अधिकारी बनली पण पेढे आणायला पैसे नसल्याने आईने साखर खाऊ घालून मुलीचं तोंड गोड केलं, त्यानंतर शेजार-पाजारीही साखर वाटून आपली लेक अधिकारी बनल्याचं सेलीब्रेशन झालं.
दरम्यान, बबिता दुमका जिल्ह्यातील ज्या गावात राहते, तिथं ना पक्का रस्ता आहे ना प्यायला स्वच्छ पाणी. त्यामुळे, आता आदिवासी समाजासाठी आणि अशा लोकांसाठी काम करायचं असल्याचं बबिताने म्हटलं. तसेच, या पाड्यातील मुलींनी शिक्षण घेऊन मोठं व्हावं हेही तिचं स्वप्न आहे.
कौतुकास्पद! डिलिव्हरी बॉय झाला उपजिल्हाधिकारी, वाचा संघर्षातून यश मिळवणाऱ्या तरुणाची यशोगाथा
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.