AFP via Getty Images

पूर्व अफगाणिस्तानमध्ये, पाकिस्तानच्या सीमेजवळ असलेल्या भागात 6.0 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का बसला असून मोठे नुकसान झाले आहे.


या भूकंपात 622 जणांचा मृत्यू झाल्याचे तालिबान सरकारने सांगितले आहे. तर, 1500 हून अधिक जखमी झाल्याची माहिती आहे.


जास्त मृत्यू हे अफगाणिस्तानातील कुनार प्रांतातील आहेत. हा अतिशय दुर्गम आणि डोंगराळ प्रदेश आहे.


भूकंपामुळे या भागातील माती आणि दगडांनी बनलेली घरे कोसळली, भूस्खलनामुळे रस्ते बंद झाले आहेत. जखमींना ढिगाऱ्यातून बाहेर काढून हेलिकॉप्टरद्वारे सुरक्षितस्थळी हलविण्यात येत असून बेपत्ता नागरिकांचा शोध सुरु आहे.


याआधी, बीबीसी अफगाण सर्व्हिसचे प्रतिनिधी हाफिजुल्लाह मारुफ यांनी कुनार प्रांतातील अनेक सुत्रांशी त्यांनी बातचीत केली होती. त्या सुत्रांनी त्यांना असे सांगितले की 'शेकडो जणांचे मृत्यू झाल्याची शंका आहे.'


आता मृतांचा आकडा समोर आला आहे. तालिबान सरकारने सांगितले की कुनार प्रांतात 610 आणि नांगरहार प्रांतात 12 असे एकूण 622 जण या विनाशकारी भूकंपात मृत्युमुखी पडले आहेत.

'प्रत्येक पाच मिनिटांनी एक रुग्ण दाखल होतोय'

या भूकंपाचे केंद्र अफगाणिस्तानातील पाचव्या क्रमांकाचे मोठे शहर असलेल्या जलालाबाद या ठिकाणापासून 27 किमी दूर आहे. हे शहर नांगरहार या प्रांताची राजधानी आहे.


नांगरघर या ठिकाणी शुक्रवारी आणि शनिवारी पूरस्थितीमुळे परस्थिती गंभीर होती. या पुरात 5 जणांचा मृत्यू झाला होता.


अफगाणिस्तानची राजधानी काबूलपासून हे शहर 200 किमी आहे. या ठिकाणी देखील या भूकंपाचे धक्के जाणवल्याचे सांगण्यात आले.


स्थानिक वेळेनुसार रात्री 11.47 ला हा भूकंपाचा धक्का बसला. याचे केंद्र भूपृष्ठापासून 8 किमी असल्याचे अमेरिकेच्या भूगर्भशास्त्र विभागाने सांगितले.


BBC अफगाणिस्तानात भूकंपाचा धक्का

भूकंपाच्या या मोठ्या धक्क्यानंतर पुन्हा सौम्य स्वरूपाचे दोन धक्के जाणवले. त्यांची तीव्रता 4.5 आणि 5.2 इतकी होती.


अनेक घरांचे नुकसान या भूकंपामुळे झाले असल्याचे अफगाणिस्तानातील तालिबान सरकारातील सुत्रांनी बीबीसीला सांगितले आहे. मझार व्हॅलीतील अनेक घरांचे नुकसान झाले आहे.


कुनार प्रांताची राजधानी असलेल्या असदाबाद या ठिकाणी असलेल्या रुग्णालयात सातत्याने रुग्ण दाखल होत असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.


विभागीय रुग्णालयाचे प्रमुख डॉ. मुलादाद यांनी सांगितले की सातत्याने रुग्ण दाखल होत असल्यामुळे रात्रीपासून ते आणि त्यांचे सर्व कर्मचारी हे कुणीही झोपलेलं नाही. दर पाच मिनिटांनी एक रुग्ण दाखल होत आहे.


त्यांनी सांगितले की गेल्या काही तासांत रुग्णालयात 188 जखमींना दाखल करण्यात आले.


Taliban Government जखमी व्यक्तीला हेलिकॉप्टरमधून हलवताना

मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हा भाग अतिशय दुर्गम आहे. भूकंपापासून संरक्षण व्हावे अशी प्रणाली या घरांसाठी वापरण्यात आलेली नाही.


तालिबान सरकारने म्हटले आहे की त्यांच्याकडे अत्यंत मर्यादित संसाधने आहेत तेव्हा आंतरराष्ट्रीय संघटनांनी आम्हाला मदत करावी.


प्रभावित क्षेत्रात जाण्यासाठी हेलिकॉप्टरची मदत करण्यात यावी असे आवाहन तालिबानी अधिकाऱ्यांनी केले आहे.


अफगाणिस्तानच्या नांगरहार विमानतळावर सरकारी अधिकारी कुनार प्रांतातील जखमींना रुग्णालयात पोहोचवण्यासाठी हेलिकॉप्टर तैनात करत आहेत.


Taliban Government विमानतळावरून, रुग्णवाहिका जखमींना आसपासच्या रुग्णालयात हलवत आहेत.

हेलिकॉप्टरमधून जखमींना विमानतळावर आणलं जात आहे, आणि विमानतळावरून रुग्णवाहिका जखमींना आसपासच्या रुग्णालयात हलवत आहेत.


जखमींवर उपचार करण्यासाठी आणि त्यांची वाहतूक करण्यासाठी वैद्यकीय कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर कुनार प्रांतात पोहोचले आहेत.


शिवाय, नांगहार प्रांतात, डझनभर स्वयंसेवक रक्तदान करण्यासाठी रुग्णालयात दाखल झाले आहेत.


तालिबान सरकार बाधित भागात लवकरात मदत पाठवण्याचा प्रयत्न करत आहे.


(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)



  • रशियामध्ये 8.8 तीव्रतेचा भूकंप; अमेरिका, जपान आणि रशियाला त्सुनामीचा इशारा

  • गुगलने आपली चूक केली मान्य, तुर्की भूकंपावेळी 1 कोटी लोकांना इशाराच पाठवला नाही

  • पाण्यामुळे तर आग विझते, मग खोल समुद्रात ज्वालामुखीचा उद्रेक कसा होतो?


Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.