जुने नाशिक: भाभानगर भागाला लागून असलेल्या दादासाहेब गायकवाड सभागृहाच्या मागील बाजूस नंदिनीच्या काठावर जिलेटिन नळ्यांचा साठा मोठ्या प्रमाणावर मिळून आला. ऐन सणासुदीत सापडलेल्या या साठ्यामुळे खळबळ उडाली होती. मात्र तपासणीअंती या मुदतबाह्य नळ्या असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. संभाव्य शक्यता लक्षात घेता श्वान पथक आणि बॉम्बशोधक पथकाकडून नळ्यांची तपासणी करण्यात येऊन साठा जप्त करण्यात आला.


भाभानगरातील दादासाहेब गायकवाड सभागृहाच्या मागे नंदिनी नदीकाठावर मोठ्या प्रमाणावर ज्वलनशील जिलेटिन नळ्यांचा साठा असल्याचे रविवारी (ता. ३१) सकाळी काही नागरिकांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने मुंबई नाका पोलिसांना घटनेची माहिती दिल्यानंतर येथे पोलिस दाखल झाले. साठा मोठा असल्याने त्वरित श्वान पथक आणि बॉम्बशोधक पथकास पाचारण करण्यात आले. त्यांच्या माध्यमातून नळ्यांच्या साठ्याची सखोल पाहणी केली गेली. खानकाम व्यवसायात वापरण्यात येणाऱ्या जिलेटिन नळ्यांचा तो साठा असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.


सर्व नळ्या मुदत संपलेल्या असल्याचेही पोलिसांनी सांगितले. यानंतर पोलिसांसह नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. असे असले तरी त्यावर काही वस्तू पडली असता किंवा अचानक स्फोट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पोलिसांनी पुढील कारवाईसाठी संपूर्ण साठा जप्त केला असून, संशयितांविरुद्ध मुंबई नाका पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.


अचानक कोणी इतक्या मोठ्या प्रमाणावर जिलेटिन साठा आणून टाकला असावा, त्यामागे काय कारण असावे, सणासुदीत घातपाताची तर शक्यता नाही ना, असे विविध प्रश्न यानिमित्त नागरिकांनी उपस्थित केले. घटनेची माहिती परिसरात पसरताच पोलिस पथकासह बघ्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती.


सीसीटीव्ही फुटेज तपासणी


जिलेटिन नळ्यांचा साठा आढळून आलेल्या परिसरात असलेल्या सीसीटीव्हीचे फुटेज तपासणी करण्यात येणार आहे. हा साठा कुणी आणि का आणून टाकला आहे, याचा शोध घेतला जात आहे. भंगार वेचणारे बऱ्याचदा या भागात येतात. अशी मुले किंवा व्यक्ती नजरचुकीने नळ्यांच्या संपर्कात आले असते, तर कदाचित मोठी दुर्घटना घडली असती. सुदैवाने मोठा अनर्थ टळला.

धक्कादायक! 'विठुरायाच्या लाडू प्रसादाच्या पाकिटामध्ये आळी'; मंदिर समितीच्या भोंगळ कारभारामुळे भाविकांमध्ये नाराजी

मुदतबाह्य जिलेटिन नळ्यांचा साठा असला तरी अशाप्रकारे ज्वलनशील पदार्थ सार्वजनिक ठिकाणी फेकणे गुन्हा आहे. त्यामुळे साठा टाकणाऱ्या संबंधित व्यक्तीचा शोध घेतला जात आहे. त्याच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.


- संतोष नरुटे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, मुंबई नाका पोलिस ठाणे

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.