मुंबई : नाशिक गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडाचा घटक) (Mhada) नाशिक शहर (Nashik) परिसरातील गंगापूर शिवार, देवळाली शिवार, पाथर्डी शिवार, म्हसरुळ शिवार, नाशिक शिवार व आगर टाकळी शिवार २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेतील विविध गृहप्रकल्पांतर्गत ४७८ सदनिकांच्या विक्रीकरिता आयोजित संगणकीय सोडतीकरिता ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेचा शुभारंभ महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचे (म्हाडा) उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल (भा.प्र.से.) यांच्या हस्ते आज 'गो - लाईव्ह' कार्यक्रमांतर्गत करण्यात आला. वांद्रे पूर्व येथील म्हाडा मुख्यालयात दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या या कार्यक्रमाला मंडळाचे मुख्य अधिकारी शिवकुमार आवळकंठे, मुख्य अभियंता धीरजकुमार पंदिरकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल वानखडे आदी उपस्थित होते.         


याप्रसंगी संजीव जयस्वाल यांनी नाशिक मंडळाच्या सोडतीत सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या अर्जदारांना आवाहन केले की, म्हाडाच्या सोडतीसाठी तयार करण्यात आलेल्या https://housing.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरूनच व म्हाडा लॉटरी ॲपवरुन इच्छुक अर्जदारांनी अर्ज करावा. मंडळातर्फे सदनिकांच्या वितरणासाठी कोणालाही प्रतिनिधी, सल्लागार व प्रॉपर्टी एजंट म्हणून नेमलेले नाही. अर्जदाराने कोणत्याही अशा व्यक्तीशी परस्पर व्यवहार करू नये तसे केल्यास नाशिक मंडळ अथवा म्हाडा प्रशासन कोणत्याही व्यवहारास / फसवणूकीस जबाबदार राहणार नाही. म्हाडाची IHLMS 2.0 ही संगणकीय प्रणाली अत्यंत पारदर्शक , सोपी व सुलभ आहे करिता इच्छुक अर्जदारांनी याच सोडत प्रणालीच्या सहाय्याने सोडत प्रक्रियेमध्ये सहभाग घ्यावा. नूतन संगणकीय सोडत प्रणाली ही संपूर्णतः ऑनलाईन व पारदर्शक असून कोणत्याही प्रकारे मानवी हस्तक्षेपास वाव नाही, असेही श्री. जयस्वाल यांनी सांगितले. सोडत प्रक्रियेत सहभाग घेण्याकरिता नियमावली, मार्गदर्शक सूचना माहिती पुस्तिकेत नमूद करण्यात आल्या आहेत.  ही पुस्तिका म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर इच्छूक अर्जदारांकरिता उपलब्ध करून देण्यात आली आहे. सर्व इच्छूक अर्जदारांनी अर्ज नोंदणी व अर्ज भरणा करण्याआधी या माहिती पुस्तिकेचे अवलोकन करण्याचे आवाहन श्री. जयस्वाल यांनी केले आहे.  नाशिक मंडळाची ही या वर्षातील तिसरी सोडत असून यापूर्वी मंडळाने ३७९ सदनिका, १०५ दुकाने आणि ३२ भूखंडांचे यशस्वी वितरण केले असल्याचेही श्री. जयस्वाल यांनी सांगितले. 


अर्ज करण्याची अंतिम मुदत कधी?


सोडतीसाठी दिनांक ०४ सप्टेंबर, २०२५ रोजी दुपारी ०१.०० वाजेपासून ऑनलाईन अर्ज नोंदणीला सुरुवात झाली असून,  दिनांक ०३ ऑक्टोबर, २०२५ रोजी रात्री ११. ५९ वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज नोंदणी करता येणार आहे. नोंदणीकृत अर्जदारांना दिनांक ०३ ऑक्टोबर, २०२५ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत अर्जदारांना ऑनलाईन अर्ज  सादर करता येणार आहे. दिनांक ०३ ऑक्टोबर, २०२५ रोजी रात्री ११.५९ पर्यंत ऑनलाइन अनामत रकमेची स्वीकृती केली जाणार आहे. दिनांक ०४ ऑक्टोबर, २०२५ रोजी संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत RTGS/NEFT द्वारे अनामत रकमेचा भरणा अर्जदारांना करता येईल. सोडतीसाठी स्वीकृत अर्जांच्या अंतिम यादीची प्रसिद्धी दिनांक १७ ऑक्टोबर, २०२५ रोजी दुपारी १२.०० वाजता म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर केली जाणार आहे.  सोडतीचा दिनांक व स्थळ संकेतस्थळावर कळविले जाणार आहे. नाशिक मंडळाच्या या सोडतीत २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गतच्या एकूण ४७८ सदनिकांचा समावेश असून या सर्व सदनिका अल्प उत्पन्न गटातील अर्जदारांसाठी उपलब्ध आहेत. सोडतीअंतर्गत देवळाली शिवारात २२ सदनिका, गंगापूर शिवारात ५० सदनिका, पाथर्डी शिवार ६४ सदनिका, म्हसरुळ शिवार १९६ सदनिका, नाशिक शिवार १४ सदनिका, आगर टाकळी शिवार १३२ सदनिका तर नाशिक शिवारात १४ सदनिका विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.


  


आंदोलन बंदबाबत लिहिलेल्या पत्रावरुन मिलिंद देवरांचे घुमजाव; मी लोकशाहीत राहतो याचा मला अभिमान

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.