टी-20 क्रिकेट वर्ल्ड कपच्या ‘रन’धुमाळीला 7 फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. त्याआधीच ‘आयसीसी’ने कर्णधारांच्या शक्तिप्रदर्शनाचे व्यासपीठ असलेला ‘कॅप्टन्स डे’ जाहीर केला आहे. विशेष म्हणजे, यंदा कॅप्टन्स डे मुंबई आणि कोलंबो या दोन शहरांमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. 5 फेब्रुवारीला होणाऱया या मीडिया कार्यक्रमात जगभरातील संघांचे कर्णधार थेट पत्रकारांशी संवाद साधणार आहेत.
मुंबईत 12 संघांचे कर्णधार एकाच मंचावर
मुंबईत होणाऱया ‘कॅप्टन्स डे’ मीटमध्ये तब्बल 12 संघांचे कर्णधार सहभागी होणार आहेत. गुरुवारी (दि. 5) होणाऱया या कार्यक्रमात यजमान हिंदुस्थान, अफगाणिस्तान, कॅनडा, इंग्लंड, इटली, नामीबिया, नेपाळ, न्यूझीलंड, स्कॉटलंड, दक्षिण आफ्रिका, अमेरिका आणि वेस्ट इंडीज या संघांचे कर्णधार उपस्थित राहतील. हे सर्व कर्णधार दोन गटांत विभागले जाणार असून, मीडिया संवादात ते वर्ल्ड कपपूर्व तयारी, रणनीती आणि अपेक्षा यावर स्पष्ट भूमिका मांडणार आहेत. हा कार्यक्रम मुंबईतील वानखेडे स्टेडियममधील बीसीसीआय कार्यालयात होणार आहे.
कोलंबोमध्ये 8 देशांचे कर्णधार मैदानात उतरतील
मुंबईसोबतच 5 फेब्रुवारीला कोलंबो (श्रीलंका) येथेही कॅप्टन्स डे आयोजित केला जाणार आहे. येथे श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, आयर्लंड, नेदरलँड्स, ओमान, पाकिस्तान, यूएई आणि झिम्बाब्वे या 8 देशांचे कर्णधार सहभागी होतील. येथेही कर्णधार दोन गटांत विभागले जाणार आहेत. त्यामुळे इकडेही मुंबईप्रमाणेच दोन पत्रकार परिषदा होणार आहेत. हा कार्यक्रम कोलंबोतील मर्कंटाईल क्रिकेट असोसिएशन येथे पार पडणार आहे.