चिवला किनाऱ्यावर
मृत ‘ऑलिव्ह रिडले’
मालवण : येथील प्रसिद्ध चिवला बीचवर ऑलिव्ह रिडले जातीचे कासव मृतावस्थेत आढळून आले. स्थानिकांनी ही बाब तातडीने प्राणीप्रेमी शिल्पा खोत यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर वनविभागाच्या मदतीने कासवावर रीतसर अंत्यसंस्कार करण्यात आले. चिवला बीच परिसरात फिरणाऱ्या स्थानिकांना समुद्रकिनारी एक कासव मृतावस्थेत पडलेले दिसले. स्थानिकांनी तातडीने याची माहिती प्राणीप्रेमी शिल्पा खोत यांना दिली. खोत यांनी तत्काळ कांदळवन वनविभागाशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. कांदळवन वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी महादेव शिंगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी येत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून रीतसर पंचनामा केला आणि मृतदेहाची विल्हेवाट लावली. यावेळी कांदळवन परिमंडळ वनाधिकारी एस. ए. सुतार, वनमजूर रमाकांत मांजरेकर, नीतेश गितये उपस्थित होते. समुद्रकिनाऱ्यावर दुर्मीळ कासव जिवंत अथवा मृत आढळल्यास स्थानिक नागरिक व पर्यटकांनी वनविभागाशी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले.
....................
‘मालवण प्रीमियर लीग’
क्रिकेट स्पर्धा २२ पासून
मालवण : टोपीवाला हायस्कूलच्या बोर्डिंग मैदानावर मालवण स्पोर्ट्स क्लबतर्फे ‘मालवण प्रीमियर लीग २०२६’ लेदर बॉल टी-२० क्रिकेट स्पर्धेचे आयोजन २२ फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधीत केले आहे. विजेत्या संघांना अनुक्रमे ५५ हजार, ३३ हजार रुपये व चषक दिला जाणार आहे. प्रथम येणाऱ्या ८ संघांनाच प्राधान्य दिले जाणार आहे. इच्छुक संघ मालकांनी सुशील शेडगे, ज्ञानेश केळुसकर यांच्याशी संपर्क साधावा. क्रीडाप्रेमींनी या क्रिकेट स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
.......................
मालवणात बुधवारी
धार्मिक कार्यक्रम
मालवण : श्री सद्गुरू सदानंद माऊली महाराज यांचा ९० वा जन्मोत्सव बुधवारी (ता. ११) साजरा होणार आहे. येथील श्रीक्षेत्र दत्त मंदिर, वायरीबांध येथे या सोहळ्याचे आयोजन केले असून यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. या सोहळ्याची सुरुवात सकाळी ९ वाजता महाराजांच्या निर्गुण पादुकांवर होणाऱ्या लघुरुद्राभिषेक व महापूजेने होईल. दुपारी १२.३० वाजता मध्यान्ह आरती, १.३० वाजता महाप्रसाद, सायंकाळी ७.१५ वाजता धूपारती, रात्री ८ वाजता घुमडाई प्रासादिक भजन मंडळ, घुमडे यांचे भजन (बुवा-नाना सामंत), ९ वाजता श्री स्वामी समर्थ प्रासादिक भजन मंडळ, पेंडुर-कट्टा यांचे भजन (बुवा-शामसुंदर आचरेकर), १० वाजता सांप्रदायिक भजनाने कार्यक्रमाची सांगता होईल. माऊली परिवारातील सर्व सदस्यांनी आणि भाविकांनी या सोहळ्याला उपस्थित राहून श्रींच्या दर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन कार्याध्यक्ष कृष्णा बांदेकर यांनी केले आहे.
.........................
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.