पुणे - पार्लर व्यावसायिक महिलेची आर्थिक फसवणूकसह इतर गुन्हे दाखल झाल्यानंतर पसार झालेल्या पोलिस हवालदाराला भारती विद्यापीठ पोलिसांनी आंध्रप्रदेशमधून अटक केली आहे. पोलिसावर भारती विद्यापीठ, चतुःश्रृंगी आणि कोथरूड पोलिस ठाण्यात आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत.


गणेश अशोक जगताप (वय-५२, रा. कावेरीनगर पोलिस वसाहत, वाकड, पुणे) असे हवालदाराचे नाव आहे. रविवारी (ता.८) दुपारी त्याला भारती विद्यापीठ पोलिसांनी ताब्यात घेतले. सद्या तो पोलिस खात्यातून निलंबित आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जगतापने पार्लर व्यावसायिक महिलेची अडीच लाखाहून अधिक रोकड, सुमारे सहा तोळे सोन्याचे दागिणे घेऊन फसवणूक केली होती.


घरच्यांच्या आजारपणाचा बहाणा करून, तसेच मुलीच्या शिक्षणाचे कारण सांगून त्याने ही फसवणूक केली होती. याप्रकरणी, भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात जगतापवर गुन्हा दाखल आहे. तर जुलै महिन्यात जगताप याच्यावर कोथरूड पोलिस ठाण्यात एका महिलेचे ७३ तोळे सोने आणि १७ लाख रुपये रोख घेऊन फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल झाला होता.


२१ ऑगस्ट २०२४ ला जगतापची पोलिस मुख्यालयातून विशेष शाखेत बदली करण्यात आली होती. मात्र हजर न राहता त्याने यादरम्यान एका सराफाला गंडा घातला. औंध भागात असलेल्या एका सराफी व्यावसायिकडून जगताप याने पोलिस दलातील माजी वरिष्ठ अधिकाऱ्याचे नाव वापरून आठ लाख २२ हजार रुपयांचे दागिने खरेदी केले होते. या घटनेमुळे विशेष शाखेचे तत्कालीन पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी जगताप यांचे निलंबन केले होते.


गेल्या काही दिवसांपासून जगताप पसार होता. त्याच्यावर गुन्हे दाखल असलेल्या पोलिस ठाण्यातील पथके मागावर होती. दोन दिवसांपूर्वी भारती विद्यापीठ पोलिसांना जगताप आंध्रप्रदेशातील कडप्पा जिल्ह्यातील फुलपथरु गावात वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सहायक पोलिस निरीक्षक स्नेहल थोरात, पोलिस अंमलदार मंगेश गायकवाड यांच्या पथकाने रविवारी (ता.८) दुपारी जगताप याला ताब्यात घेतले.


राष्ट्रपती पदकासाठी सादर केली खोटी कागदपत्रे -


राष्ट्रपती पदक मिळविण्यासाठी त्याने खोटी कागदपत्रे सादर केल्याचा आरोप जपतापवर आहे. २०२१ मध्ये सरकारची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिस दलातील गणेश जगताप सह दोन लिपिकांवर वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आली आहे.


गणेश जगताप याच्यावर आर्थिक फसवणुकीचा भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. तो चार पाच महिन्यापासून पसार झाला होता. त्या गुन्ह्यात पोलिसांनी त्याला आंध्रप्रदेशातून अटक केली आहे. सोमवारी त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने ११ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.


- मिलिंद मोहीते, पोलिस उपायुक्त, पुणे शहर

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.