आजपासून बारावीची परीक्षा
जिल्ह्यात ३३ हजार १२१ विद्यार्थी प्रविष्ट; काॅपीमुक्त परीक्षेसाठी उपाययोजना
अलिबाग, ता. ९ (वार्ताहर) ः उच्च माध्यमिक म्हणजेच बारावीची परीक्षा आजपासून सुरू होणार आहे. रायगड जिल्ह्यात एकूण ५२ केंद्रांवर या परीक्षा होणार आहेत. बारावीच्या परीक्षेसाठी जिल्ह्यातील एकूण ३३ हजार १२१ विद्यार्थी प्रविष्ट आहेत. काॅपीमुक्त परीक्षा होण्यासाठी एकूण नऊ भरारी पथके आणि पूर्ण वेळ बैठे पथक तैनात करण्यात आले आहे.
बारावीची परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा मानला जातो. यानंतर विद्यार्थी आपल्या भविष्याची वाटचाल नक्की कोणत्या दिशेने करायची आहे, हे ठरवतात. त्यामुळे या परीक्षेला अधिक महत्त्व देण्यात येते. परीक्षा सुरळीत व्हाव्यात यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार असून, परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस दलाची मदत घेतली जाणार आहे. बारावीच्या परीक्षेसाठी जिल्ह्यातील एकूण ३३ हजार १२१ विद्यार्थी प्रविष्ट आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समितीही गठित करण्यात आली आहे. परीक्षा केंद्रांवर परीक्षेआधी एक तास व परीक्षेनंतर एक तास बैठक पथक असणार आहे. त्यामुळे काॅपीमुक्त परीक्षा होण्यास मदत होणार आहे. जिल्हाधिकारी किशन जावळे व राजिप मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी सर्व प्रविष्ट विद्यार्थ्यांना काॅपी न करता कोणतीही भीती मनात न बाळगता परीक्षा देण्याचे आवाहन केले आहे.
परीक्षा केंद्रांच्या परिसरात कडक निर्बंध
प्रत्येक परीक्षा केंद्राच्या ५० मीटरच्या परिसरात मोबाईल फोन, पेजर वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच एसटीडी बुथ, झेरॉक्स मशीन, फॅक्स मशीन चालू ठेवण्यास मनाई करण्यात आली आहे. प्रत्येक पेपरच्या २४ तास आधीपासून परीक्षा केंद्रांच्या ५० मीटर परिसरातील झेरॉक्स दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
परीक्षेआधी विद्यार्थ्यांची झडती
विद्यार्थ्यांची परीक्षा केंद्रांवर आल्यानंतर शाळेतील कर्मचाऱ्यांकडून झडती घेण्यात येणार आहे. मुलींच्या तपासणीसाठी अंगणवाडी सेविका, मदतनीस, शाळेच्या महिला कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. जर विद्यार्थ्यांकडे कोणत्याही प्रकारची काॅपी आढळल्यास विद्यार्थ्यांना त्या विषयाचा पेपर देण्यास मनाई करण्यात येईल.
परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही, ड्रोनची नजर
परीक्षा केंद्रांत सीसीटीव्हीची करडी नजर असणार आहे. तसेच ड्रोनद्वारेही कॉपी देणाऱ्या व करणाऱ्यांवर नजर असणार आहे. यंदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस पथकेही तैनात करण्यात आली आहेत.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.