ठाणे जिल्ह्यावर श्वानसंकट
६७ हजार जणांना घेतला चावा
ठाणे शहर, ता. १० (बातमीदार) : भटक्या श्वानांची समस्या गंभीर समस्या बनली आहे. अशा श्वानांमुळे ठाणे जिल्ह्यातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. जिल्ह्यात नागरिकांना भटक्या श्वानांकडून चावा घेण्याचे प्रमाण वाढले आहे. वर्षभरात जिल्ह्यात तब्बल निम्म्या लाखांहून अधिक जणांना श्वानांनी चावा घेतला आहे. उल्हासनगर यात आघाडीवर आहे. या शहरात श्वानांनी चावा घेतलेल्या लोकांची संख्या सर्वात जास्त आहे. श्वानांनी चावा घेतलेल्या ६७,११३ जणांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेतले असले तरी प्रत्यक्षात अशा रुग्णांची संख्या लाखांवर असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
रेबीजसारख्या घातक आजाराची लागण श्वानदंश झाल्याने होते. ज्या श्वानांना रेबीज आहे, असे कुत्रे इतरांना चावले, तर त्यांच्या लाळेतून रेबीज चावा घेतलेल्यांच्या शरीरात प्रवेश करतात. त्यावर योग्य उपचार केले नाहीत, तर रुग्णाचा मृत्यू होण्याची दाट शक्यता असते. श्वान चावल्याने अशा घातक आजाराची शक्यता असताना ठाणे जिल्ह्यात ६७,११३ जणांना कुत्र्यांनी चावा घेतल्याची घटना घडल्याने जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार जानेवारी २०२५ ते जानेवारी २०२६ या एका वर्षाच्या कालावधीत जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांत ६७,११२ नागरिकांना रेबीज प्रतिबंधक लसीकरण करावे लागले आहे. जिल्ह्यातील शहरी व दाट लोकवस्तीच्या भागांमध्ये कुत्रा चावण्याच्या घटनांचे प्रमाण अधिक असल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले आहे. उल्हासनगर-३ येथे सर्वाधिक १२,५९४ जणांना कुत्र्यांनी चावा घेतला आहे, परंतु प्रत्यक्षात ही संख्या जास्त असण्याची शक्यता आहे. कुत्रे चावल्यानंतर सगळेच उपचार घेत नाहीत. काही जण या घटनेस किरकोळ समजून रुग्णलयात जात नाहीत, अथवा काही जण स्थानिक खासगी डॉक्टरांकडे जाऊन औषध घेतात.
आरोग्य यंत्रणेसमोर आव्हान
आरोग्यतज्ज्ञांच्या मते, रेबीज हा आजार एकदा बळावल्यास प्राणघातक ठरतो. त्यामुळे कुत्रा किंवा कोणत्याही संशयित प्राण्याने चावा घेतल्यास जखम तत्काळ साबण व स्वच्छ पाण्याने धुवून, विलंब न करता लसीकरण करून घेणे आवश्यक आहे. कुत्रा चावण्याच्या वाढत्या घटनांमुळे ठाणे जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
वेळीच उपचार घेणे आवश्यक
रेबीज घातक असला तरी त्यापासून वाचण्यासाठी वेळीच उपचार घेतल्यास धोका टाळू शकतो. अशा वेळी विशेषतः लहान मुलांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. भीतीपोटी मुले कुत्रा चावल्याचे पालकांना सांगत नाहीत. आरोग्य यंत्रणा रेबीजचा सामना करण्यासाठी सक्षम आहे.
आपल्याकडे प्रतिबंधासाठी भटक्या कुत्र्यांची नसबंदी, लसीकरण आणि नागरिकांची जागरूकता या तिन्ही बाबी समान महत्त्वाच्या आहेत. जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये रेबीज लसीचा पुरेसा साठा उपलब्ध आहे.
- डॉ. कैलास पवार, जिल्हा शल्य चिकित्सक, ठाणे
उपचार घेतलेले रुग्ण :
भिवंडी - ११,७९३
उल्हासनगर ४ - ९,७८८
अंबरनाथ - ८,४५०
ठाणे - ५,१५७
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.