पिंपरी - महापालिका निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांकडे भारतीय जनता पक्षाने वैयक्तिक अहवाल मागितला आहे. त्यात पराभवाची कारणे, पक्षाचे काम कोणी केले नाही, पक्षविरोधी भूमिका कोणी घेतली आदींची विचारणा करण्यात आली आहे.


त्यानुसार बहुतांश उमेदवारांनी आपापले अहवाल पाठवले असून, येत्या दोन-तीन दिवसांत प्रदेश समितीकडे अहवाल पाठविला जाणार आहे. पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांवर वरिष्ठ नेते काय कारवाई करतात, याकडे लक्ष लागले आहे.


पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी १५ जानेवारी रोजी मतदान आणि १६ जानेवारीला निकाल जाहीर झाले. प्रचार काळात पक्ष नेत्यांनी शंभरपेक्षा अधिक जागा जिंकण्याचा नारा दिला होता. मात्र, १२८ पैकी ८४ जागांपर्यंतच पक्षाला मजल मारता आली. तर, एक अपक्ष पुरस्कृत विजयी झाला आहे.


दोन जागांवर बिनविरोध उमेदवार निवडून आले. भाजपला एकहाती सत्ता मिळाली. या जमेच्या बाजू असल्या तरी माजी महापौर उषा ढोरे, माजी उपमहापौर सचिन चिंचवडे, माजी सत्तारूढ पक्षनेता नामदेव ढाके, माजी स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी यांसह अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला.


काही जणांचा पराभव साधारण दीड हजारपेक्षा कमी मतांनी पराभव झाला आहे. तीन प्रभागांत चारही उमेदवार पराभूत झाले आहेत. काही प्रभागात पॅनेलऐवजी एक किंवा दोन किंवा तीन उमेदवार विजयी झाले आहेत. त्यामुळे पॅनेलमधील विजयी झालेल्यांनी ठरवून सहउमेदवारांना पराभूत केल्याची चर्चा रंगली आहे.


दोषींचे सहा वर्षे निलंबन


‘महापालिका निवडणुकीत गमावलेल्या जागांवरील पराभवाची कारणे जाणून घेतली जात आहेत. त्यासाठी पराभव झालेल्यांसह सर्वांकडूनच वैयक्तिक स्वरुपात अहवाल मागविला आहे. एकत्रित अहवाल प्रदेश समितीकडे पाठविला जाईल. ज्यांनी पक्ष विरोधी कारवाया केल्या आहेत, बंडखोरी केली आहे, अशांचे सहा वर्षांसाठी निलंबन केले जाणार आहे. संबंधित अहवालावर आणि पक्षविरोधी भूमिका घेतलेल्यांवर पक्षश्रेष्ठींकडून कारवाई केली जाईल,’ असे भाजपचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी सांगितले.


पराभूत झालेले भाजप उमेदवार


माजी पदाधिकारी -


उषा ढोरे, सचिन चिंचवडे, नामदेव ढाके, विलास मडिगेरी, जयश्री गावडे, सुजाता पलांडे, चंद्रकांता सोनकांबळे, उषा मुंढे, अनुराधा गोफणे, चंद्रकांत नखाते, सुरेश म्हेत्रे, शांताराम भालेकर, संतोष लोंढे, संगीता भोंडवे, सिद्धेश्वर बारणे, मोरेश्वर शेडगे


ऐनवेळी पक्षात आलेले माजी नगरसदस्य -


मीनल यादव, प्रसाद शेट्टी, सद्गुरू कदम, उषा वाघेरे


नवखे उमेदवार -


दीपक भोंडवे, हर्षद नढे, कमलेश वाळके, मीनाज इनामदार, गणेश ढाकणे, नरेश पंजाबी, संदीप बागडे, सतीश नागरगोजे, शिल्पा राऊत, नीलम लांडगे, शीतल मासुळकर, मोनिका निकाळजे, सोनाली गाढे, रश्मी लांडे, प्रतिभा जवळकर, दुर्गाकौल आदियाल, शीतल यादव, मनीषा कुलकर्णी, गणेश मळेकर, संदेश काटे

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.