सोमेश्वरनगर, ता. १३ : बारामती तालुका पंचायत समितीचे सभापतिपद पहिल्या अडीच वर्षात खुले राहणार आहे. त्यामुळे खुल्या गटातील किरण तावरे, दिग्विजय जगताप व जितेंद पवार या तीन विजयी उमेदवारांमध्ये चुरस राहणार आहे. चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर एक तरुण सभापती बारामतीला मिळणार आहे.
बारामतीमध्ये मागील वीस वर्षात पोपटराव पानसरे, संदीप बांदल आणि करण खलाटे हे खुल्या गटातील सभापती झाले. करण खलाटे यांचा २०१३ला कार्यकाल संपल्यानंतर थेट २०२६ मध्ये खुल्या गटाला संधी मिळाली आहे. सभापतिपद खुले असल्यानेच तालुक्यात खुल्या गटात उमेदवारीसाठी प्रचंड चढाओढ पहायला मिळाली. निंबुत, वडगाव निंबाळकर, शिर्सुफळ आणि पणदरे हे चार गण खुले होते. यापैकी शिर्सुफळमध्ये भाजपच्या कमळ चिन्हावर अनिकेत गावडे हे राष्ट्रवादीने उमेदवार न दिल्याने प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहकार्यानेच निवडून आले आहेत. उर्वरीत पणदरे गणातून किरण तावरे, निंबुत गणातून दिग्विजय जगताप; तर वडगाव निंबाळकर गणातून जितेंद्र पवार मोठ्या मताधिक्याने घड्याळ चिन्हावर निवडून आले. त्यामुळे या तीन तरूण चेहऱ्यांपैकी एकाच्या गळ्यात माळ पडणार आहे.
किरण तावरे हे राष्ट्रवादी युवक काँग्रेस, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष होते. त्यांच्या पत्नी मीनाक्षी तावरे या जिल्हा परिषद सदस्य होत्या. दिग्विजय जगताप हे एकविसाव्या वर्षी वाणेवाडीसारख्या बड्या गावचे सरपंच झाले. सध्या त्यांच्या पत्नी वाणेवाडीच्या लोकनियुक्त सरपंच आहेत. त्यांचे चुलते कै. रामराजे जगताप हे बारामतीचे पहिले सभापती होते. तर, वडगाव निंबाळकरच्या जितेंद्र पवार यांनीही जाणता राजा प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक कार्य उभे केले आहे. त्यांच्या रूपाने पक्षाला नवा चेहरा मिळाला आहे. उपसभापतिपदासाठी पुरुषांचा विचार झाल्यास पळशीचे आदर्श सरपंच बाबा चोरमले व राष्ट्रवादी भवनचे कार्यकर्ते नितीन काकडे हे चेहरे आहेत. मताधिक्याचा विचार करून पाचपैकी एका महिलेचाही उपसभापतिपदासाठी विचार होऊ शकतो.


अनेक वर्षानंतंर खुल्या गटातील उमेदवारांना संधी मिळणार आहे. अजितदादांच्या आशीर्वादाने तीन ठिकाणी खुल्या जागेवर आमचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी व पक्षातील वरिष्ठांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल.
- संदीप बांदल, तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस, बारामती

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.