पुणे : दारू पिताना झालेल्या किरकोळ वादातून एका मित्राने दुसऱ्याच्या डोक्यात लाकडी दांडक्याने जोरदार प्रहार केला. हा मार जिव्हारी लागल्याने तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना येरवडा परिसरात शनिवारी (ता. १४) दुपारी सुमारे अडीच वाजता घडली. यातील आरोपीला लक्ष्मीनगर पोलिसांनी अटक केली आहे.

Nagpur Crime: दारूच्या वादातून मित्राचा खून; नागपुरात तीन जणांना अटक

मशाक विजापुरे (वय ३१, रा. गणेश वखार, येरवडा) असे यामध्ये मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून त्याचा मित्र गणेश शिंदे याने त्याचा खून केल्याप्रकरणी त्याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मशाक आणि गणेश दोघे लक्ष्मीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत कामराजनगर, खड्डा मशिदीजवळ एकत्र बसून दारू पित होते. यावेळी किरकोळ कारणावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला. वाद चिघळल्यानंतर मशाकने आरोपीला शिवीगाळ केली. त्यामुळे संतप्त झालेल्या गणेशने जवळ पडलेला लाकडी दांडा उचलून मशाकच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला.


डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मशाक खाली कोसळला. आरोपीला तो नाटक करत असल्याचे वाटले; मात्र त्याला उठवण्याचा प्रयत्न करूनही तो न उठल्याने आरोपी घाबरला आणि तेथून पसार झाला. मशाक हा लग्नसमारंभात स्वयंपाकाचे काम करत होता, तर आरोपी गणेश हा पेंटर आहे. लक्ष्मीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी यांनी घटनास्थळाची पाहणी केली. आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी पथक रवाना केले आणि अल्पावधीतच त्याला अटक करण्यात आली.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.