24531
मालवण दांडी किनारा होणार चकाचक
सभापती, अधिकाऱ्यांकडून पाहणी; आचरेकर यांनी लक्ष वेधल्याने दखल
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १४ : पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या शहरातील दांडी समुद्रकिनाऱ्याच्या स्वच्छतेचा प्रश्न आता मार्गी लागणार आहे. या किनाऱ्यावरील कचऱ्याच्या समस्येकडे मालवण पालिकेच्या महिला व बालकल्याण समिती सभापती अन्वेषा आचरेकर यांनी लक्ष वेधल्यानंतर स्वच्छता व आरोग्य समिती सभापती पूनम चव्हाण यांनी आज सकाळी अधिकाऱ्यांसमवेत किनारपट्टीची पाहणी केली.
मालवण शहर हे जागतिक पर्यटन नकाशावर असल्याने येथे देशी-विदेशी पर्यटकांची सतत वर्दळ असते. विशेषतः ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ला आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या ठिकाणी किल्ल्याची पायाभरणी केली ते ‘मोरयाचा धोंडा’ हे पवित्र ठिकाण पाहण्यासाठी पर्यटक दांडी किनाऱ्यावर मोठी गर्दी करतात.
या वाढत्या गर्दीमुळे किनाऱ्यावर दररोज मोठ्या प्रमाणात कचरा साचत आहे. ही बाब लक्षात घेऊन अन्वेषा आचरेकर यांनी दांडी किनारपट्टीवर दररोज कचरा उचलण्यासाठी दोन स्वतंत्र कर्मचारी नियुक्त करावेत. संकलित केलेला कचरा वाहून नेण्यासाठी पूर्णवेळ ट्रॅक्टरची उपलब्धता करून द्यावी, अशी मागणी केली. या मागणीची दखल घेत आरोग्य समिती सभापती चव्हाण यांनी किनाऱ्याची पाहणी केली. स्वच्छतेच्या दृष्टीने या प्रस्तावावर प्राधान्याने विचार करून आवश्यक ती कार्यवाही करण्याची ग्वाही दिली. पर्यटकांना स्वच्छ परिसर मिळावा, यासाठी दांडी किनाऱ्यावर कायमस्वरुपी स्वच्छता यंत्रणा राबवणे आवश्यक आहे, असे आचरेकर यांनी स्पष्ट केले. या पाहणी दौऱ्यावेळी शिवसेना नगरसेवक महेश कोयंडे, सुपरवायझर पवन धुरी, स्वच्छता मुकादम श्री. वळंजू यांसह पालिकेचे कर्मचारी व स्थानिक नागरिक उपस्थित होते.
--------
काही ठळक मुद्दे
- दांडी समुद्रकिनाऱ्यावरील कचऱ्याच्या समस्येकडे लक्ष
- आरोग्य समिती सभापती चव्हाण यांच्याकडून पाहणी
- कचरा उचलण्यासाठी दोन स्वतंत्र कर्मचाऱ्यांची मागणी
- कचरा वाहतुकीसाठी पूर्णवेळ ट्रॅक्टर उपलब्ध करण्याचा प्रस्ताव
- पर्यटकांच्या वाढत्या गर्दीमुळे स्वच्छतेचा प्रश्न गंभीर
- स्वच्छता यंत्रणा कायमस्वरूपी राबविण्याची आवश्यकता
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.