Alibag: अलिबाग इथला एक व्हिडीओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि त्यांच्यासोबतच्या काही लोकांना स्थानिक शेतकरी हाकलून लावत असल्याचं दिसतंय. परवानगी न घेता शेतीमध्ये घुसल्याचा प्रकार घडल्याचं प्रथमदर्शनी दिसून येत आहे.
कांग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्हिडीओ एक्स अकाऊंटवरुन शेअर केला आहे. ते म्हणतात, अलिबाग तालुक्यातील म्हात्रोळी गावामध्ये स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात न घेता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे दादागिरी करून शेतीमध्ये मोजणी करण्याचे काम करत होते. स्थानिक शेतकऱ्यांनी केलेल्या विरोधामुळे नार्वेकर यांना अक्षरशः पळ काढावा लागला.
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही हा व्हिडीओ शेअर केलाय. ते म्हणतात, ''ब्रेकिंग: विधानसभा अध्यक्षांसोबत ही हाणामारी कोठे आणि का झाली? राहुल नार्वेकर यांनी पळ काढला आहे! तुम्ही सांगताय की मी सांगू?''
दरम्यान, या व्हिडीओमध्ये एक स्थानिक महिला आणि तिचे नातेवाईकराहुल नार्वेकर आणि त्यांच्यासोबतच्या लोकांना भांडताना दिसत आहेत. नार्वेकरांसोबत असलेल्या एकाला तर महिलेने चक्क मारहाण केलीय. ''आम्ही इथे नसताना संधी साधून आतमध्ये शिरता का?'' असा प्रश्न शेतकरी महिला उपस्थित करीत आहे. त्यातला एक जण म्हणतोय, मी काहीही केलेलं नाही. परंतु स्थानिकाने थेट नार्वेकरांना सुनावत तुमची चूक असल्याचं म्हटलंय.
''या घटनेशी माझा काहीही संबंध नाही. मी केवळ कौटुंबिक वाद सोडवत होतो.'' असं स्पष्टीकरण राहुल नार्वेकर यांनी दिलं आहे. विरोधी पक्षातल्या अनेकांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमगची सत्यता लवकरच समोर येईल.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.