हिंजवडी, ता. १४ : आयटी उद्योगनगरी म्हणून वेगाने विस्तारत असलेल्या हिंजवडीसह परिसरातील सात ग्रामपंचायतींचा पाच वर्षांचा कार्यकाळ अधिकृतरीत्या संपुष्टात आला आहे. सरपंच, उपसरपंच व सदस्यांची मुदत पूर्ण झाल्याने संबंधित ग्रामपंचायतींचा कारभार आता प्रशासकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
रविवार (ता. ८) पासून माण, हिंजवडी, मारुंजी, जांबे, कासारसाई तसेच नांदे, चांदे आणि घोटावडे या ग्रामपंचायतींमध्ये लोकनियुक्त प्रतिनिधींच्या जागी प्रशासकीय व्यवस्था कार्यरत झाली आहे. मुळशी पंचायत समितीत कार्यरत असलेल्या विस्तार अधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्याकडे तात्पुरता कारभार सोपविण्यात आला असून, दैनंदिन कामकाज, आर्थिक व्यवहार आणि विकासकामांचे निर्णय आता प्रशासनामार्फत घेतले जाणार आहेत.
या भागात बहुतेक आयटी कंपन्या असल्याने या परिसरातील ग्रामपंचायती आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत. कररूपी कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळत असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नेतृत्वासाठी मोठी स्पर्धा पाहायला मिळते. आगामी निवडणुकांमध्ये सरपंच थेट जनतेतून निवडला जाणार असल्याने राजकीय चढाओढ आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत. मुळशी तालुक्यात नुकत्याच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका पार पडल्या असून, त्यानंतर आता ग्रामपंचायत निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अनेक पुढाऱ्यांनी नी नुकत्याच झालेल्या निवडणुकी प्रचारादरम्यान स्वतःचेही ब्रँडिंग आणि प्रचाराचा दुहेरी संगम साधला होता.


निवडणुका पुढे ढकलल्या
बारावी व दहावीच्या परीक्षा काळामुळे ग्रामपंचायत निवडणुका तात्पुरत्या लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. एप्रिल किंवा मे महिन्यात निवडणुका होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे गावपातळीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. तोपर्यंत प्रशासकीय यंत्रणेसमोर मूलभूत सुविधा सुरळीत राखण्याचे आणि विकासकामांना गती देण्याचे आव्हान उभे राहिले आहे. विशेषतः आयटी परिसरातील वाढती लोकसंख्या, पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते व कर संकलन या बाबींवर प्रशासनाची कसोटी लागणार आहे.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.