ANI

पुरुषांच्या ट्वेन्टी20 विश्वचषकाच्या साखळी फेरीत भारतानं पाकिस्तानचा 61 धावांनी पराभव केला. कोलंबोमध्ये झालेल्या सामन्यात भारतानं प्रथम फलंदाजी करत पाकिस्तानसमोर विजयासाठी 176 धावांचं आव्हान ठेवलं. पण पाकिस्तानचा संपूर्ण संघ 114 धावांवर गारद झाला.


प्रथम फलंदाजी करताना भारताकडून ईशान किशननं जबाबदारी उचलली आणि पाकिस्तानच्या गोलंदाजांची अक्षरशः धुलाई केली. त्यानं 77 धावा केल्या. ईशान सामनावीरही ठरला.


ईशानबरोबर तिलक, सूर्यकुमार आणि शिवम दुबेच्या फलंदाजीनं भारताला 7 बाद 175 धावांपर्यंत मजल मारता आली. पाकिस्तानतच्या साईम अयूबनं 3 विकेट घेतल्या.


प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संपूर्ण संघ 114 धावांवर बाद झाल्याचं पाहायला मिळालं.


पहिल्या दोन ओव्हरमध्येच पांड्या आणि बुमरानं पाकिस्तानचे आघाडीचे तीन फलंदाज तंबूत परतवले. होते.


पाकिस्तानकडून उस्मान खानच्या 44 धावा वगळता कुणालाही फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. पहिल्या चार फलंदाजांना तर दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही.


भारताकडून बुमरा, पांड्या, अक्षर आणि वरुण या चौघांनीही प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. तर कुलदीप आणि तिलक वर्माला प्रत्येकी एक विकेट मिळाली.


या विजयासह भारतानं विश्वचषकाच्या सुपर 8 फेरीतलं स्थान पक्कं केलं आहे. गुणतालिकेत भारत पहिल्या स्थानी आहे.


आतापर्यंत टी 20 वर्ल्ड कपच्या इतिहासात झालेल्या 9 सामन्यांमध्ये भारतानं 8 सामने जिंकले आहेत, तर पाकिस्ताना आजवर फक्त एक सामना जिंकता आला आहे.


BBC

या सामन्यात पाकिस्ताननं नाणेफेक जिंकत आधी गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. दरम्यान, यावेळीही दोन्ही कर्णधारांनी हँडशेक केला नसल्याचं पाहायला मिळालं.


भारतीय संघात दोन बदल करण्यात आले होते. अभिषेक शर्मा संघात परतला तर अर्शदीपच्या जागी कुलदीपला संघात स्थान मिळालं होतं.

असा रंगला भारताचा डाव

या सामन्यातल्या पहिल्याच षटकात पाकिस्तानचा कर्णधार आणि ऑफस्पिनर सलमान अली आगानं भारताच्या अभिषेक शर्माला स्वस्तात बाद केलं. अभिषेक शर्माला स्पर्धेत पुन्हा एकदा भोपळाही फोडता आला नाही. त्यामुळे भारताची अवस्था 1 बाद 1 अशी झाली.


पण पहिली विकेट विकेट गमावल्यानंतर ईशान किशनने भारताच्या धावसंख्येवर त्याचा परिणाम होऊ दिला नाही. त्यानं दुसऱ्याच ओव्हरमध्ये शाहीन शाह आफ्रिदीच्या गोलंदाजीवर फटकेबाजी करत इरादे स्पष्ट केलं.


नंतरच्या ओव्हरमध्येही त्यानं धावसंख्या कमी होऊ दिली नाही. त्यामुळं पॉवरप्ले संपेपर्यंत सहा षटकांत भारतानं 1 बाद 52 धावा केल्या होत्या. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या तिलक वर्मानंही त्याला चांगली साथ दिली.


ईशान किशनने सातव्या ओव्हरमध्ये 27 चेंडूमध्ये त्याचं अर्धशतक पूर्ण केलं.


त्यानंतर पायाचा स्नायू दुखावल्यानं त्यानं काही वेळ उपचारही घेतले. पण त्यानंतर नवव्या षटकात सईम अयूबनं ईशानला बोल्ड करत भारताला दुसरा धक्का दिला.


इशाननं 40 चेंडूमध्ये 77 धावा केल्या.


इशान बाद झाल्यावर सईमनंच पंधराव्या षटकात तिलक वर्मा आणि हार्दिक पंड्या या दोघांनाही लागोपाठच्या चेंडूंवर बाद केलं.


तिलक वर्मानं 25 धावा केल्या तर हार्दिक पांड्या शून्यावर बाद झाला.


त्यानंतर सूर्यकुमार यादव (32 धावा) आणि शिवम दुबेनं (27 धावा) भारताची धावसंख्या वाढवण्यासाठी मदत केली. पण फटकेबाजीच्या प्रयत्नात सूर्यकुमार बाद झाला. तर शिवम दुबे धावबाद झाला.


त्या जोरावर भारतानं 7 बाद 175 धावा केल्या.


पाकिस्तानच्या साईम अयूबनं 3 विकेट घेतल्या तर शाहीन शाह आफ्रिदी, सलमान अली आगा आणि तारिक उस्मान यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.


त्यानंतर वरुण चक्रवर्तीनं एकापाठोपाठ दोन चेंडूवर फहीम अश्रफ आणि अबरार अहमद दोघांना बाद केलं. त्यामुळं पाकिस्तानची अवस्था 9 बाद 97 झाली.


त्यानंतर हार्दिक पांड्यानं उस्मान तारिकला शून्यावर बाद करत पाकिस्तानचा खेळ खल्लास केला.

पाकिस्तानचा डाव

भारतानं दिलेलं 176 धावांचं आव्हान पेलण्यासाठी मैदानात उतरलेल्या पाकिस्तानच्या फलंदाजांची सुरुवातही खराब झाली.


हार्दिक पांड्यानं पहिल्याच ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर साहीबजादा फरहानला शून्यावर बाद करत.


भारत आणि पाकिस्तान दोन्ही संघाला पहिल्याच ओव्हरमध्ये धक्का बसल्याचं पाहायला मिळालं.


त्यानंतर दुसऱ्या ओव्हरसाठी मैदानावर आलेल्या बुमरानं पाकिस्तानला दुसरा धक्का दिला. त्यानं साईम अयूबला एलबीडब्ल्यू बाद केलं. त्याच्या आधीच्या चेंडूवरच साईम अयूबनं षटकार खेचला होता. पण बुमरानं जोरदार पुनरागमन केलं.


साईम अयूब 6 धावांवर बाद झाला.


त्यानंतर त्याच ओव्हरमध्ये बुमरानं पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगाला बाद केलं. हार्दिक पांड्यानं त्याचा झेल घेतला. आगाला फक्त 4 धावा करता आल्या.


त्यानंतर पाचव्या ओव्हरमध्ये अक्षर पटेलनं बाबर आझमला 5 धावांवर बोल्ड करत पाकिस्तानला चौथा धक्का दिला.


त्यानंतर पाकिस्तानच्या उस्मान खाननं शादाबच्या साथीनं डाव सावरण्याचा प्रयत्न प्रयत्न केला. त्यानं काही चांगले फटकेही मारले.


पण अक्षर पटेलनं त्याला फिरकीच्या जाळ्यात अडकवलं. तो 44 धावा करून बाद झाला.


त्यानंतर कुलदीपनं पुढच्याच ओव्हरमध्ये मोहम्मद नवाजला बाद केलं. त्याला फक्त 4 धावा करता आल्या.


सूर्यकुमार यादवनं पुढची ओव्हर करण्यासाठी तिलक वर्माला आमंत्रित केलं. तिलकनं पहिल्याच चेंडूवर शादाबला बाद करत पाकिस्तानला 7 वा धक्ला दिला.

भारताची बॉलिंग स्ट्रॅटेजी ठरली वरचढ?

एक नाही, दोन नाही, तर सहा. पाकिस्ताननं भारताविरूद्धच्या ट्वेन्टी20 विश्वचषकाच्या लढतीत सहा फिरकी गोलंदाज खेळवले आणि एकाच वेगवान गोलंदाजाला मैदानात उतरवलं. भारतानं मात्र दोन वेगवान गोलंदाज आणि तीन फिरकीपटूंना खेळवलं.


पाकिस्तानची फिरकीचं जाळं विणण्याची रणनीती टीम इंडियानं यशस्वी होऊ दिली नाही.


खरंतर सुरुवातीला त्या जाळ्यात भारताचे फलंदाज अडकतायत असं चित्र दिसलं होतं. पण ईशान किशननं 77 धावांची खेळी केली आणि भारताला 7 बाद 175 धावांची मजल मारता आली.


ANI

मग हार्दिक पंड्या आणि जसप्रीत बुमरानं पाकिस्तानच्या डावाला सुरुवातीलाच खिंडार पाडलं. पाकिस्तानची टीम त्यातून सावरलीच नाही.


त्यानंतर भारताच्या फिरकी गोलंदाजांनीही अचूक मारा केला आणि पाकिस्तानचा डाव 114 धावांवर आटोपला.


भारताकडून हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमरा, अक्षर पटेल आणि वरूण चक्रवर्तीनं प्रत्येकी 2 विकेट्स काढल्या. तर कुलदीप यादव आणि तिलक वर्मानंही एक एक विकेट काढत टीमच्या विजयाला हातभार लावला.

ईशान विरुद्ध पाकिस्तानचे स्पिनर्स

पाकिस्तानचे स्पिनर्स विरुद्ध ईशान किशन. कोलंबोत ट्वेन्टी20 विश्वचषकाच्या लढतीत भारताच्या डावाचं वर्णन असंच करावं लागेल.


कारण पाकिस्ताननं या सामन्यात सहा फिरकी गोलंदाजच खेळवले आणि टीम इंडियाच्या धावसंख्येला ब्रेक लावला.


अगदी पहिल्याच षटकात सलमान आगानं अभिषेक शर्माला भोपळाही न फोडता माघारी धाडलं होतं. पण सलामीवीर ईशान किशननं मात्र आरामात पाकिस्तानी गोलंदाजांचा सामना केला.


ANI

फिरकी गोलंदाजीचा नेमका अंदाज घेणं आणि योग्य वेळी फटका खेळणं ईशानला किती चांगलं जमतं, हे त्यानं पुन्हा एकदा दाखवून दिलं आणि 27 चेंडूंमध्येच अर्धशतक साजरं केलं.


ईशाननं 40 चेंडूंमध्ये 10 चौकार आणि 3 षटकारांसह 77 धावांची खेळी केली.

उस्मान तारिकची कामगिरी

कोलंबोतील भारत पाकिस्तान सामन्याआधी तारिक उस्मानच्या गोलंदाजीच्या शैलीविषयी बरीच चर्चा झाली. कारण तारीक बॉल टाकताना अखेरच्या क्षणी जेमतेम सेकंदभर जरासा थांबतो.


त्यामुळे उस्मानवर तो चकिंग करत असल्याचे म्हणजे नियमबाह्य गोलंदाजी करत असल्याचे आरोपही झाले. पण अशा पॉझविषयी क्रिकेटच्या नियमांत काही बंधनं नाहीत.


तरीही थोडं वेगळेपण असल्यानं तो फलंदाजांना त्रास देऊ शकतो असा अंदाज मांडला जात होता. त्यामुळेच भारतीय टीम सरावादरम्यान त्याचा अभ्यास करताना दिसली.


प्रत्यक्ष सामन्यात उस्माननं टाकलेल्या पहिल्या षटकात सूर्यकुमार यादवनं त्याचा चांगला सामना केला.


मात्र नंतर एकोणिसाव्या षटकात उस्माननं सूर्याला बाद केलं. त्याच्या गोलंदाजीचं पृथःकरण होतं, 4 षटकांत 24 धावा आणि 1 विकेट.


बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.



  • 'चकिंग'ची चर्चा असलेला पाकिस्तानी गोलंदाज ट्रम्प कार्ड ठरणार? 'पॉज'वर अश्विननं काय मार्ग सुचवला?

  • टी-20 वर्ल्डकप : भारत-पाकिस्तान सामना होणार; BCCI आणि पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू काय म्हणाले?

  • भारताच्या 'या' खेळाडूचे पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूंकडून कौतुक, नेमकं काय म्हणाले?


Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.