पुणे : कधी जादा परताव्याचे आमिष, पोलिस अधिकारी असल्याचा बनाव रचून, तर कधी डेटा सुरक्षेच्या नावाखाली सायबर गुन्हेगारांकडून नागरिकांची फसवणूक होत आहे. शहरात तिघांची साडेतीन कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या तीन घटना उघडकीस आल्या असून, त्यामध्ये दोन ज्येष्ठांचा समावेश आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर चोरट्यांनी १९ डिसेंबर रोजी वानवडीतील एका ८६ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्क साधला. स्वतःला पोलिस अधिकाऱ्याच्या गणवेशात दाखवत तुमच्या बॅंक खात्याचा वापर ‘मनी लॉन्ड्रिंग’ च्या प्रकरणात झाला आहे. याबाबत कुलाबा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, अटक करण्याची धमकी दिली. बॅंक खात्यांची पडताळणी करण्याच्या बहाण्याने ज्येष्ठाच्या बॅंक खात्यांची माहिती घेतली. त्यानंतर चोरट्यांनी दबाव टाकून एक कोटी २७ लाख ५३ हजार रुपये विविध खात्यांमध्ये हस्तांतरित करून घेतले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर १८ फेब्रुवारी रोजी त्यांनी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक स्वप्नाली शिंदे करीत आहेत.


दुसऱ्या प्रकरणात सायबर चोरट्यांनी १३ जानेवारी रोजी एरंडवणातील एका ७० वर्षीय नागरिकाशी मोबाइलवर संपर्क साधला. ‘पर्सनल डेटा प्रोटेक्शन ऑफिसर’ असल्याचे भासवत तुमच्या आधारकार्डचा गैरवापर करून सोशल मीडियावर अश्लील छायाचित्रे पाठवली जात आहेत. तुमचा प्रतिबंधित संघटनेशी संबंध असून, बॅंक खात्याद्वारे दीड कोटींची फसवणूक झाल्याचे सांगितले. आर्थिक गुन्ह्यात चौकशी सुरू असल्याचा बहाणा करण्यात आला. फिर्यादी आणि त्यांच्या पत्नीवर दबाव टाकून दोन कोटी रुपये विविध खात्यांत वर्ग करून घेतले. या गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक संगीता देवकाते करीत आहेत.


अन्य एका प्रकरणात सायबर चोरट्यांनी पार्ट टाइम जॉब देण्याच्या बहाण्याने खराडीतील ३३ वर्षीय व्यक्तीशी संपर्क साधला. त्यांना ‘ऑनलाइन टास्क’ पूर्ण केल्यास मोठा नफा मिळेल, असे सांगितले. सुरुवातीला कमी रकमेवर नफा दाखवून विश्वास संपादन केला. त्यानंतर ‘ ऑनलाइन टास्क’च्या नावाखाली मोठी गुंतवणूक करण्यास भाग पाडले. बनावट ॲप, खोटे डॅशबोर्ड आणि ऑनलाइन व्यवहारांचा आभास निर्माण करून ११ लाख रुपये इतकी रक्कम उकळली.

Digital Arrest Scam : ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली महिलेला पावणेपाच कोटींचा गंडा

सायबर गुन्हेगारांकडून बनावट ओळख, खोटी कागदपत्रे, व्हिडिओ कॉल, अधिकृत वाटणारे लोगो आणि ॲपचा वापर करून नागरिकांना मानसिकदृष्ट्या गोंधळात टाकले जाते. विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि कमी वेळात नफ्याच्या शोधात असलेले तरुण लालसेपोटी सायबर चोरट्यांच्या जाळ्यात अडकतात. त्यामुळे नागरिकांनी अनोळखी कॉल्स, सरकारी चौकशीच्या नावाखाली अनोळखी व्यक्तींच्या बॅंक खात्यात पैसे जमा करणे किंवा जादा परतावा देणाऱ्या गुंतवणूक योजनांपासून सावध राहावे, असे आवाहन सायबर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

सायबर चोरट्यांची गुन्ह्याची पध्दत

  • आधी विश्वास संपादन


  • त्यानंतर भीती किंवा जादा नफ्याचे आमिष


  • शेवटी मोठ्या रकमेचे ऑनलाइन व्यवहार


फसवणूक टाळण्यासाठी लक्षात ठेवा

  • कोणतीही सरकारी यंत्रणा तपासासाठी पैसे मागत नाही.


  • जादा परताव्याच्या आश्वासनावर तत्काळ निर्णय घेऊ नका.


  • आधार, पॅन कार्ड, बँक तपशील किंवा ओटीपी कोणालाही देऊ नका.


  • संशयास्पद लिंक, ॲप किंवा क्यूआर कोड स्कॅन करू नका.


  • फसवणूक झाल्यास १९३० हेल्पलाईनवर संपर्क साधा किंवा सायबर पोलिस ठाण्यात तक्रार करा.


Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.