वडगाव निंबाळकर, ता. १९ : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनामुळे बारामती तालुक्यावर शोककळा पसरली आहे. या दुःखात मुस्लिम समाजही सहभागी असल्याची भावना व्यक्त करत यंदाची रमजान ईद साध्या पद्धतीने साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
रमजान हा मुस्लिम धर्मीयांसाठी अत्यंत पवित्र महिना मानला जातो. उपवास, नमाज, दानधर्म आणि प्रार्थना यांना या महिन्यात विशेष महत्त्व असते. यावर्षी तालुक्यातील मुस्लिम समाजाने धार्मिक विधींव्यतिरिक्त कोणताही उत्सव किंवा जल्लोष न करण्याचा निर्णय घेतला आहे. विविध मशिदींमध्ये विशेष नमाज पठण करून अजितदादांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार असल्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अल्पसंख्यांक विभागाच्या बारामती तालुका पदाधिकाऱ्यांसह मशिदींचे ट्रस्टी, मौलाना आणि समाजप्रमुख यांच्या बैठकीत घेण्यात आला.
‘‘बारामती तालुक्यावर आलेल्या या दुःखद प्रसंगी आम्ही सर्वजण एकजुटीने उभे आहोत. आनंदोत्सव टाळून साध्या पद्धतीने ईद साजरी करणे हीच आमच्याकडून खरी आदरांजली ठरेल,’’ असे मत बैठकीत व्यक्त करण्यात आले. यासंदर्भातील निवेदन राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संभाजी होळकर, तालुकाध्यक्ष संदीप बांदल, धनवान वदक यांना देण्यात आले. बैठकीस तालुकाध्यक्ष मुन्ना बागवान, राजूभाई पठाण, रहमान शेख, अजीम इनामदार, शब्बीर मुलानी, असलम मुलानी, शौकतभाई कोतवाल यांच्यासह तालुक्यातील मुस्लिम बांधव उपस्थित होते.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.