मुंबई - वाढता कामाचा ताण, असह्य प्रशासकीय दबाव आणि मूलभूत सुविधांच्या तीव्र कमतरतेमुळे मध्य रेल्वेतील लोको पायलट्समध्ये प्रचंड असंतोष उसळला आहे. या पार्श्वभूमीवर तब्बल ७३ मेल लोको पायलट्सनी सामूहिक स्वेच्छानिवृत्तीचे अर्ज सादर करीत रेल्वे प्रशासनाला थेट इशाराच दिला आहे. या अभूतपूर्व निर्णयामुळे रेल्वे वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, मनुष्यबळ व्यवस्थापनासमोर गंभीर प्रश्न उभा राहिला आहे.
सोमवारी (ता. १६) एकाच वेळी विभागीय रेल्वे व्यवस्थापकांकडे अर्ज सादर करीत प्रशासकीय जाचातून मुक्त करा अन्यथा सेवेत राहणे अशक्य, अशी स्पष्ट भूमिका लोको पायलट्सनी मांडली. एकाच दिवशी एवढ्या मोठ्या संख्येने स्वेच्छानिवृत्ती अर्ज सादर होणे ही बाब प्रशासनासाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.
कामाचा ताण इतका वाढला आहे, की ड्युटी संपल्यानंतरही मानसिक थकवा जात नाही. विश्रांती, सुविधा आणि सन्मानजनक वागणूक मिळाली तरच सेवेत राहणे शक्य आहे, अशी प्रतिक्रिया नाव न सांगण्याच्या अटीवर लोका पायलटने दिली. वारंवार तक्रारी करूनही परिस्थितीत बदल होत नाही. आरोग्य आणि कुटुंब या दोन्हींवर परिणाम होत असल्याने स्वेच्छानिवृत्तीचा पर्याय स्वीकारण्याची वेळ आल्याचे दुसऱ्या एका लोको पायलटने सांगितले.
मध्य रेल्वेचे म्हणणे काय?
यासंदर्भात मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी सांगितले, की सामूहिक स्वेच्छानिवृत्ती अर्ज देण्याचा प्रकार हा आंदोलनाचे एक नवे स्वरूप आहे. विविध मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी अशा प्रकारची निवेदने दिली जातात. प्रत्यक्षात बहुतांश लोको पायलट्सना सेवा सोडण्याची इच्छा नसते. नियमित आरोग्य तपासण्या, रनिंग रूममधील विश्रांतीची व्यवस्था, स्वच्छता, आहार तसेच मूलभूत सुविधांमध्ये सातत्याने सुधारणा केल्या जात आहेत. कर्मचाऱ्यांकडून आलेल्या तक्रारींची नोंद घेऊन टप्प्याटप्प्याने उपाययोजना सुरू आहेत.
स्वेच्छानिवृत्तीमागील प्रमुख कारणे
निकृष्ट दर्जाचे अन्न : रनिंग रूम व विश्रांतीगृहांतील जेवणाबाबत तीव्र नाराजी
अपुऱ्या सुविधा : स्वच्छता, बेडिंग, पाणी व देखभालीचा अभाव
असुरक्षित प्रवेश क्षेत्र : सुरक्षित मार्ग व प्रकाशयोजनेची कमतरता
प्रशासकीय दबाव : चौकशा, नोटिसा आणि मानसिक ताण
तणावपूर्ण कामाचे वातावरण : दीर्घ ड्युटी, अपुरी विश्रांती
आरोग्यावर परिणाम : झोपेचा अभाव, मानसिक थकवा
कौटुंबिक जीवनावर परिणाम : घराकडे दुर्लक्ष होण्याची वेळ
मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष : लॉबी, ट्रिप शेड, विश्रांतीगृहांतील गैरसोयी
निवेदने दिली; तरीही दखल शून्य
समस्या सोडवण्यासाठी वारंवार निवेदने देण्यात आली, बैठका झाल्या; प्रत्यक्षात मात्र परिस्थिती जशीच्या तशी राहिल्याची नाराजी व्यक्त करण्यात आली. प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांना असंवेदनशील वागणूक मिळत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळेच अखेर सामूहिक स्वेच्छानिवृत्तीचा टोकाचा निर्णय घ्यावा लागल्याचे स्पष्ट करण्यात आले.
अतिरिक्त ड्युटी : सततच्या ड्युटी, अनियमित वेळापत्रक आणि अपुरी विश्रांती यामुळे मानसिक व शारीरिक थकवा प्रचंड वाढल्याचे लोको पायलट्सनी नमूद केले आहे. झोपेचा अभाव, तणाव आणि आरोग्य बिघडत असल्याने सुरक्षिततेवरही परिणाम होऊ शकतो, अशी गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली आहे. याचा फटका कौटुंबिक आयुष्यालाही बसत असल्याचे पायलट्सनी सांगितले.
रनिंग रूम ते लॉबी; सर्वत्र हलाखी
रनिंग रूममधील निकृष्ट अन्न, अस्वच्छता, स्वच्छ पाण्याचा अभाव, अपुऱ्या सुविधा, लॉबी व ट्रिप शेडमधील गैरसोयी यांचा पायलट्सकडून तपशीलवार पाढा वाचण्यात आला. दीर्घ प्रवासानंतरही आवश्यक विश्रांती न मिळाल्यास सुरक्षिततेलाच धोका निर्माण होऊ शकतो, असे अर्जात नमूद आहे.
दबाव, चौकशांचा धाक
लोको पायलट्सनी निवेदनात म्हटले आहे, की रेल्वेची सुरक्षित धावपळ सांभाळताना अत्यंत जबाबदारीची भूमिका पार पाडावी लागते. त्या मानाने कामाचे तास, विश्रांती व मानसिक आधार मात्र मिळत नाही. प्रामाणिक, शिस्तबद्ध सेवा देऊनही दबाव, चौकशांचा धाक आणि प्रशासकीय छळ सहन करावा लागत आहे, असा संतप्त सूर अर्जात उमटला आहे.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.