26016


बालहृदयात अपार शिवप्रेम;
रॅलीतून इतिहासाला सलाम


कळसुलकर शाळेत शिवजयंती थाटात


सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २० ः येथील सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी प्राथमिक शाळा अर्थात कळसुलकर प्राथमिक शाळेच्या पहिली ते चौथीच्या मुलांनी शिवरायांच्या विविध वेशभूषा सादर करत कळसुलकर शाळा ते उभा बाजार येथील शिवस्मारकापर्यंत शिवरॅली काढत शिवजयंती उत्साहात साजरी केली.
यामध्ये जिजाऊ, शिवराय, शंभुराजे, तानाजी मालुसरे, शिवा काशिद, सईबाई, सोयराबाई, मावळे आदी अनेक वेशभूषा साकारल्या. सकाळी शाळेमध्ये शिवप्रतिमेचे पूजन झाल्यानंतर सर्व मुलांनी शिवरायांच्या घोषणा देत शिवपुतळ्यासमोर विविध कार्यक्रम सादर केले. मुख्याध्यापक प्रदीप सावंत यांच्या हस्ते शिवपुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. तिसरीची विद्यार्थिनी आत्रेया हिने शिवगर्जना सादर केली. त्यानंतर मुलांनी भाषणे केली. शाळेचे सहाय्यक शिक्षक डी. जी. वरक यांनी पोवाडा गीत सादर केले. मुलांना शिवजन्माविषयी माहिती दिली. स्थानिक मित्रमंडळाच्या वतीने मुलांना खाऊ तसेच अल्पोपहार वाटप करण्यात आला. शिवरायांचा जयघोष करत ही रॅली शाळेकडे येत कार्यक्रमाची सांगता झाली. या उपक्रमाला परिसरातील नागरिकांनी विशेष प्रोत्साहन दिले. शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप सावंत, डी. जी. वरक, अमित कांबळे, ज्योत्स्ना गुंजाळ, प्राची बिले, संजना आडेलकर, स्मिता घाडीगावकर आदी शिक्षक, पालक व बहुसंख्य विद्यार्थी सहभागी झाले.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.