भरत उबाळे : सकाळ वृत्तसेवा
शहापूर, ता. २२ : पुणे शहर व जिल्ह्याला जोडणाऱ्या माळशेज घाट मार्गावरील शहापूर तालुक्यातील वाशाळा ते कसारा हा प्रमुख जिल्हा मार्ग सध्या खड्ड्यांनी अक्षरशः चाळण झाला आहे. नागमोडी व तीव्र चढ-उतार असलेल्या या रस्त्यावर जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघातांची मालिका सुरू आहे. ग्रामस्थ व विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. प्रशासन व ठेकेदारांच्या बेजबाबदारीमुळे मंजुरी मिळूनही रस्ताचे काम रखडल्याने संतप्त नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारला.


या रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळून त्याचा कालावधीही संपत आला, तरीही ठेकेदाराने एप्रिल २०२५ पासून काम बंद ठेवले आहे. वाशाळा, वेळूक, ढाकणे, कोथळे, फुगाळे, कलभोंडे, कोठारे, तलवाडा व डोळखांब ग्रामपंचायतींसह अनेक गाव-पाड्यांसाठी हाच एकमेव प्रमुख जिल्हा मार्ग आहे. या नागमोडी व चढ-उतार असलेल्या रस्त्यावर जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघाती मृत्यू, कायमचे अपंगत्व आणि गंभीर जखमी होण्याच्या घटना घडत आहेत. गेल्या महिन्यात जांभूळवाड येथील एका युवकाचा अपघातात मृत्यू झाला, तर त्याच्यासोबतची व्यक्ती गंभीर जखमी आहे. टोकरखांड येथील शिक्षकाला अपघातात कायमचे अपंगत्व आले असून सोबतची शिक्षिका जखमी झाली. चिंध्याची वाडीतील एक युवकही अपघातामुळे कायमचा अपंग झाला आहे. गेल्या पाच वर्षांतील अपघातांची मोजदाद करणे कठीण झाल्याचा संताप ग्रामस्थांनी व्यक्त केला


येत्या आठ दिवसांत कामाला सुरुवात न झाल्यास मुंबई-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर रास्तारोको आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा वाशाळा-कसारा रस्ता विभागीय संघर्ष समितीने दिला आहे.



विद्यार्थी, पालकांमध्ये भीती
विशेष म्हणजे हा मार्ग तब्बल १७ शाळांना जोडणारा जीवनदुवा आहे. दररोज शेकडो विद्यार्थी पायी ये-जा करतात. अपघातांच्या वाढत्या घटनांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये तीव्र भीती निर्माण झाली आहे.


ग्रामस्थांच्या मागण्या
रस्त्याचे काम तत्काळ सुरू करावे, धोकादायक वळणे व चढ-उतार कमी करावेत, झाडे-झुडपे हटवून रस्ता मोकळा करावा, पाण्याचा निचरा होण्यासाठी गटारे व मोऱ्यांची व्यवस्था करावी, नवीन पुलाची उंची वाढवावी, भावली धरण योजनेमुळे रस्त्याला अडथळा येणार नाही याची दक्षता घ्यावी, रस्त्याची मंजूर रुंदी कायम ठेवावी तसेच संरक्षक भिंती मजबूत कराव्यात, अशा मागण्या केल्या आहेत.


आरोग्य, शिक्षण, रोजगार आणि दैनंदिन जीवनासाठी हाच प्रमुख जिल्हा मार्ग एकमेव दुवा आहे. प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष गावकऱ्यांच्या जीवाशी खेळणारे ठरत आहे. हा प्रश्न केवळ खड्ड्यांचा नसून लोकांच्या अस्तित्वाचा आहे. आठ दिवसांत ठोस निर्णय न झाल्यास जनआक्रोश रस्त्यावर उतरेल.
- कुलदीप धानके, तालुकाप्रमुख, ठाकरे शिवसेना


वाशाळा ते कसारा रस्ते काम बंद असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. ग्रामस्थांच्या मागणीप्रमाणे रस्ते बांधकामाच्या दिरंगाईबद्दल ठेकेदाराला सूचना देण्यात येणार आहेत.
- बळवंत कांबळे, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग, शहापूर


शहापूर : वाशाळा पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंत्यांना निवेदन दिले.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.