पुणे - अमली पदार्थांच्या अवैध व्यापारावर लगाम घालण्यासाठी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने कारवाई करत ४३ किलो गांजासह चार सराईत गुन्हेगारांना अटक केली. या कारवाईत २१ लाख ९१ हजार रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला असून, दोन चारचाकी वाहने आणि पाच मोबाईल ताब्यात घेण्यात आले आहेत.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर येथील कदमवाक वस्ती परिसरात १४ फेब्रुवारी रोजी एका सोसायटीसमोर अक्षय पोपटराव पाडुळे (वय ३१, रा. नवीन म्हाडा कॉलनी, हडपसर) आणि विशाल दत्तात्रेय जाधव (वय २८, रा. हिंगणे मळा, हडपसर) हे दोघे सुमारे सहा लाख ८८ हजार रुपये किमतीचा ३४ किलो गांजा विक्रीसाठी बाळगताना आढळून आले. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.


या गुन्ह्याचा पुढील तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. त्यानंतर गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथक-एकचे पोलिस निरीक्षक वाहिद पठाण आणि साहाय्यक निरीक्षक अनिल सुरवसे यांच्या पथकाने तपासाला सुरुवात केली. १८ फेब्रुवारी रोजी धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात विशेष मोहीम राबविण्यात आली.


डोंगराळ भागात सापळा रचून मंगेश जाण्या पावरा (वय २९, रा. भोगावडे खुर्द, ता. धडगाव, जि. नंदुरबार) याला ताब्यात घेतले. त्यानंतर ज्ञानेश्वर मगन पावरा (वय २५, रा. सांगवी, ता. शिरपूर, जि. धुळे) याला मुंबई-आग्रा महामार्गालगत सांगवी परिसरातून अटक केली. त्याच्याकडून ९ किलो ४२० ग्रॅम गांजा आणि पाच लाख रुपये किमतीची कार जप्त करण्यात आली.


ही कारवाई पोलिस आयुक्त अमितेश कुमार, पोलिस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त आयुक्त पंकज देशमुख, पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे यांच्या सूचनेनुसार पोलिस निरीक्षक वाहिद पठाण यांच्या पथकाने केली.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.