रण उत्सवात श्रेया, रेखा यांचा शाही अंदाज
मुंबई, ता. २३ : कच्छच्या अथांग पांढऱ्या रणावर दरवर्षी रंग, परंपरा आणि सौंदर्याचा अद्भुत मेळा पाहायला मिळतो. याच मोहक वातावरणात जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेल्या कच्छच्या रणमध्ये साजऱ्या होणाऱ्या रण उत्सवाला अलीकडे वेगळीच झळाळी मिळाली. फेमिना मिस इंडिया स्पर्धेतील फर्स्ट रनर-अप श्रेया पूंजा आणि रेखा पांडे यांनी या रणभूमीला भेट देत कच्छच्या सौंदर्याचा खास अनुभव घेतला.
पांढऱ्या मिठाच्या विस्तारात त्यांचा शाही अंदाज पाहून उत्सवाची रंगत अधिकच वाढली. उत्सवाच्या गजबजाटापासून थोडे दूर जात दोघींनी वाळवंटी रस्त्यांवरून प्रवास केला. शांत परिसर, दूरवर पसरलेले क्षितिज आणि निसर्गाची भव्यता यामुळे हा अनुभव खास ठरला. या दरम्यान त्यांनी प्राचीन वारसा लाभलेल्या धोळावीराला भेट दिली. तसेच उत्सवाचे मुख्य ठिकाण असलेल्या ढोरडो गावातील सांस्कृतिक वातावरणही अनुभवले. या गावाला यूएनडब्ल्यूटीओकडून सन्मान मिळाला आहे. स्थानिक हस्तकलेसाठी ओळखल्या जाणाऱ्या ‘गांधी नु गाम’ सारख्या भागांमुळे कच्छची ओळख अधिक ठसठशीत दिसून आली. सूर्यास्तानंतर चांदण्यांत चमकणारा रण, लोकसंगीताचा नाद आणि रंगीबेरंगी सांस्कृतिक सादरीकरण यामुळे हा प्रवास संस्मरणीय ठरला. आज कच्छचा रण केवळ पर्यटनापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर परंपरा, पर्यावरण आणि स्थानिक जीवन यांचा समतोल जपत नव्या प्रकारच्या पर्यटनाची दिशा दाखवत आहे.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.