rat२६p१२.jpg-
P२६O२७३५३
काजू बोंडे
-------
‘काजू बोंडे’ प्रक्रिया उद्योगाअभावी वाया
कोट्यवधींच्या महसुलावर पाणी; गोवा राज्याचा पॅटर्न राबवण्याची मागणी
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. २६ ः रत्नागिरी जिल्ह्यात काजू उद्योग दरवर्षी कोट्यवधी रुपयांची आर्थिक उलाढाल करत असला तरी नियोजनाच्या अभावामुळे शेतकरी मात्र पूर्ण फायद्यापासून वंचित राहत आहेत. जिल्ह्यात काजू बीवर प्रक्रिया करणारे अनेक उद्योग उभे राहिले असले तरी ‘काजू बोंडे’ मात्र प्रक्रिया उद्योगाअभावी मोठ्या प्रमाणात वाया जात आहेत. दरवर्षी केवळ आश्वासने देऊन बागायतदारांच्या तोंडाला पाने पुसली जात आहेत.
यंदाच्या हंगामात काजू बीला सुरुवातीला १५० रुपये प्रतिकिलो असा चांगला भाव मिळत आहे. ओल्या काजूगराची (ओली काजू बी) १०० नग २५० रुपयांपर्यंत विकली जात आहे. काजू बी प्रक्रिया उद्योगात मोठी आर्थिक उलाढाल होत असली तरी शेतकऱ्यांकडून कवडीमोल भावाने खरेदी करून दलालच त्यातून मोठा नफा कमावत असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे काजू बोंडांकडे मात्र पूर्णपणे दुर्लक्ष होत असून, ती बागेतच सडून जात आहेत.
शेजारील गोवा राज्याने काजू बोंडांचे महत्त्व ओळखून त्यावर आधारित मद्यार्क (फेणी) आणि औषधी द्रव्ये बनवण्याचे मोठे उद्योग उभे केले आहेत. गोव्यात काजू बोंडांना मोठी मागणी असल्याने रत्नागिरीतूनही मोठ्या प्रमाणात बोंडे तिथे नेली जातात. काजू बोंडांपासून उच्चदर्जाचे मद्यार्क आणि आरोग्यदायी पेये तयार होऊ शकतात; परंतु रत्नागिरी जिल्ह्यात मात्र आजही या तंत्रज्ञानाचा आणि धोरणाचा अभाव आहे.
-----
शेतकऱ्यांच्या प्रमुख समस्या
* जे उद्योजक बोंड प्रक्रियेसाठी पुढाकार घेतात त्यांना शासन आणि प्रशासनाकडून सहकार्य मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत.
* काजू बोंडे लवकर खराब होत असल्याने त्यांच्या संकलनासाठी साखळी उपलब्ध नाही.
* मद्यार्क निर्मिती आणि प्रक्रिया उद्योगाबाबत राज्य सरकारचे धोरण शेतकऱ्यांसाठी अजूनही पोषक ठरलेले नाही.
-------
चौकट
प्रशासनाकडून हे अपेक्षित...
काजू बी आणि बोंडू या दोन्ही घटकांपासून प्रक्रिया उद्योग सुरू झाल्यास कोकणातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती भक्कम होऊ शकते. यासाठी सरकारने अभ्यासपूर्ण धोरण जाहीर करून जिल्हास्तरावर प्रक्रिया युनिट्स उभ्या करण्यासाठी अनुदान आणि प्रोत्साहन देणे गरजेचे आहे.
------
१.४२ लाख हेक्टरवर काजू लागवड
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मिळून दक्षिण कोकणात १.४२ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावर लागवड आहे. त्यात रत्नागिरी जिल्ह्यात अंदाजे ६८ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावर काजू लागवड होत असून, त्यातून दरवर्षी सुमारे १ लाख टन काजू बी चे उत्पादन मिळते. जिल्ह्याच्या अर्थकारणात महत्त्वाचा वाटा असलेल्या काजूची, प्रामुख्याने ‘वेंगुर्ला-१ ते ९’ या वाणांची लागवड केली जाते.
-----
कोट १
कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात काजू उत्पादन होत आहे. त्यामध्ये तयार होणाऱ्या काजू बियांची विक्री होऊन त्यातून शेतकऱ्यांना उत्पन्न मिळते; मात्र,त्यासोबत काजू बोंडांचा सदुपयोग करत त्यावर कोकणात प्रक्रिया उद्योगांची उभारणी झाल्यास शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये वाढ होऊ शकते.
- सुघोष काळे, शेतकरी
----------
कोट
कोकणात मोठ्याप्रमाणावर काजू उत्पादन घेतले जाते. त्यावेळी मोठाप्रमाणावर काजू बोंडाचे उत्पादन होते. परंतु त्यावर कोणतीही प्रक्रिया होत नसल्याने ती वाया जातात. काजू बोडा मध्ये‘व्हिटॅमिन ‘सी’ चे प्रमाण जास्त असल्यामुळे त्यापासून हेल्थ ड्रिंक बनविले जाऊ शकते. सध्या काही ठिकाणी घरघुती पद्धतीने काजू सरबत बनविले जाते. गोव्यामध्ये लीकर बनविण्यासाठी काजू रसाचा वापर होतो.
- डॉ. शैलेश शिंदे-देसाई, काजू अभ्यासक
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.