हिंदुस्थानचा महान क्रिकेटपटू, भारतरत्न सचिन तेंडुलकरच्या घरी सध्या लगीनघाई सुरू आहे. सचिनचा मुलगा आणि युवा क्रिकेटपटू अर्जुन तेंडुलकर लवकरच सानिया चंडोक हिच्यासोबत विवाहबंधनात अडकणार आहे. 5 मार्च रोजी मोठ्या धुमधडाक्यात हा लग्नसोहळा होणार आहे. तत्पूर्वी मंगळवारी गुजरातमधील जामनगर येथे या जोडप्याचा मेंदी आणि संगीत सोहळा पार पडला. या सोहळ्याला चित्रपट, क्रीडा आणि राजकीय क्षेत्रातील दिग्गजांनी हजेरी लावली. या सोहळ्याचे काही फोटो आणि व्हिडीओही समोर आले आहेत.
अर्जुनची होणारी पत्नी सानिया चंडोक ही एका प्रतिष्ठित व्यावसायिक कुटुंबातील आहे. ती प्रसिद्ध उद्योगपती रवी घई यांची नात असून त्यांचे कुटुंब हॉटेल आणि आईस्क्रीम क्षेत्रातील दिग्गज ‘ग्रॅव्हिस ग्रुप’चे मालक आहेत. प्रसिद्ध आईस्क्रीम ब्रँड ‘बास्किन-रॉबिन्स’ आणि ‘द ब्रुकलिन क्रीमरी’ हे याच समूहाचे भाग आहेत. सानिया स्वतः सध्या मुंबईतील ‘मिस्टर पॉज पेट स्पा अँड स्टोअर’ची संचालक म्हणून जबाबदारी सांभाळत आहे.
डावखुरा वेगवान गोलंदाज असलेला अर्जुन तेंडुलकर देशांतर्गत क्रिकेटमध्ये गोव्याचे प्रतिनिधित्व करतो. आयपीएलमध्ये 2021 पासून तो मुंबई इंडियन्सशी जोडला गेला आहे. 2026 च्या आयपीएल हंगामात तो लखनऊच्या संघातून खेळणार आहे. लखनऊने त्याला 30 लाखांच्या बेस प्राईजमध्ये करारबद्ध केले आहे.
अर्जुनची एकूण मालमत्ता 21 ते 22 कोटी रुपयांच्या आसपास आहे. अर्जुनला महागड्या गाड्यांची विशेष आवड असून तेंडुलकर कुटुंबाच्या ताफ्यात पोर्श केयेन, बीएमडब्ल्यू आय 8 आणि फेरारी 360 मोडेना यांसारख्या आलिशान गाड्यांचा समावेश आहे. सध्या अर्जुन आपल्या कुटुंबासह मुंबईतील वांद्रे येथील आलिशान बंगल्यात राहतो.