UPR26B07576 अभिजित पाटील
UPR26B07575 समाधान आवताडे
कॉरिडॉरच्या मुद्द्यावरून पंढरपुरात राजकीय धूळवड
आमदार पाटील यांच्या वक्तव्यावर आमदार आवताडेंची टीका
भारत नागणे : सकाळ वृत्तसेवा
पंढरपूर, ता. ४ ः येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरातील प्रस्तावित काॅरिडाॅरचा मुद्दा पुन्हा चर्चेचा सुरू विषय झाला आहे. राज्य सरकारने काॅरिडाॅर करण्याच्या हालचाली सुरू केल्यानंतर बाधित दुकानदार आणि रहिवाशांनी त्याला विरोध केला आहे. याच मुद्द्यावरून आता राजकीय धुळवड सुरू झाली आहे.
माढ्याचे आमदार अभिजित पाटील यांनी सोमवारी (ता. २) बाधितांनी काढलेल्या मोर्चात सहभागी होत काॅरिडाॅर चंद्रभागानदीच्या पलीकडे (शेगाव दुमाला परिसर) तयार करावा अशी मागणी केली आहे. तर आमदार समाधान आवताडे यांनी आमदार पाटील यांनी एकदा वारी काळात विठ्ठल मंदिर परिसरात चालत प्रदक्षिणा पूर्ण करावी असा सल्ला दिला आहे. दोन आमदारांच्या परस्परविरोधी भूमिकेमुळे काॅरिडाॅरच्या मुद्द्याचे राजकारण होत असल्याने बाधितांमधून मात्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या विठुरायाचे सुलभ दर्शन व्हावे, भाविकांची चांगली सोय व्हावी यासाठी राज्य सरकारने उज्जैन व काशीच्या धर्तीवर काॅरिडाॅर तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस हे स्वतः आग्रही आहेत. त्यामुळे शासन पातळीवर काॅरिडाॅर तयार करण्याबाबत जोरदार हालीचाली सुरू आहेत. अलीकडेच पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली समितीने काॅरिडाॅरला मंजुरी दिली आहे. येत्या आधिवेशनामध्ये काॅरिडाॅरच्या कामासाठी निधीची तरतूद देखील केली जाण्याची शक्यता आहे.
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्यावर मुख्यमंत्र्यांनी खास जबाबदारी दिली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये काॅरिडाॅरला अंतिम मंजुरी मिळण्याची दाट शक्यता असल्याने स्थानिकांनी विरोध सुरू केला आहे. त्यानंतर माढ्याचे आमदार अभिजित पाटील यांनी बांधितांना पाठिंबा देत काॅरिडाॅर विठ्ठल मंदिर परिसरात न करता तो चंद्रभागानदी पलिकडच्या शेगाव दुमाला गावात करावा अशी मागणी केली आहे. त्यांच्या मागणीनंतर पंढरपूरचे आमदार समाधान आवताडे यांनी त्यांच्या मागणीची खिल्ली उडवली आहे. काॅरिडाॅर बाबत स्थानिक बाधित लोकांशी चर्चा झालेली आहे. आणखी त्यांच्यासोबत चर्चा केली जाणार आहे. परंतु काही लोक बाधितांच्या आडून राजकारण करत असल्याचा आरोपही आमदार आवताडे यांनी केला आहे. ऐन शिमक्या दिवशी दोन आमदारांमध्ये चांगली धुळवड रंगल्याचे पाहायला मिळाले.
---चौकट---
आमदार पाटील यांची मागणी असंयुक्तीक
विठ्ठल मंदिर परिसरात काॅरिडाॅर न करता तो शेगाव दुमाला गावाच्या हद्दीत करावा अशी अजब मागणी माढ्याचे आमदार अभिजीत पाटील यांनी केली आहे. त्यांच्या या मागणी नंतर वारकरी महाराज मंडळींमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे शेगाव दुमाला येथील शेतकऱ्यांनीही आमदार पाटील यांच्या मागणीला विरोध केला आहे. विठ्ठल मंदिर केंद्रस्थानी ठेवून विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. नदी पलिकडे किंवा इसबावी भागात विकास आराखडा तयार करुन गर्दीवर नियंत्रण मिळवता येणार नाही. आमदार अभिजित पाटील यांची मागणी संयुक्तीक नाही, असे वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी सांगितले.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.