केसनंद, ता. ४ : वाघोलीच्या (ता. हवेली) बकोरी रस्ता परिसरात वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रणासाठी या ठिकाणी तातडीने पोलीस चौकी स्थापन करण्याची मागणी माहिती सेवा समितीने केली आहे.
बकोरी रस्ता परिसरात तीन मोठी महाविद्यालये असून, सुमारे १५ हजारपेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, तर २५ हजारपेक्षा जास्त नागरिक या भागात वास्तव्यास आहेत. दररोज महाविद्यालय सुटल्यावर वेगवेगळ्या गटांमध्ये वाद, हाणामारी, दुचाकी व चारचाकी गाड्यांची बेफाम फेरी, तसेच काही ठिकाणी मुलींच्या छेडछाडीच्या घटना घडत असल्याचे स्थानिक नागरिकांनीही निदर्शनास आणून दिले आहे. त्यामुळे येथील विद्यार्थिनी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर या परिसरातील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रणासाठी या ठिकाणी तातडीने पोलिस चौकी स्थापन करण्याची मागणी माहिती सेवा समितीने केली आहे. तसेच, गृहमंत्री, पोलिस महासंचालक, पोलिस आयुक्त यांनाही समितीच्या वतीने लेखी निवेदन दिले आहे. बकोरी रस्त्यावर पोलिस चौकी स्थापन करून नियमित गस्त वाढवावी, सीसीटीव्ही यंत्रणा सक्षम करावी आणि शाळा- महाविद्यालयांच्या वेळेत विशेष पोलिस बंदोबस्त ठेवावा, अशी मागणी निवेदनात केली आहे.
याबाबत माहिती देताना माहिती सेवा समितीचे अध्यक्ष चंद्रकांत वारघडे यांनी सांगितले की, ‘‘विद्यार्थ्यांची व नागरिकांची सुरक्षितता ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे. वेळेत योग्य निर्णय घेतला नाही तर भविष्यात गंभीर घटना घडू शकतात. त्यामुळे प्रशासनाने तत्काळ कारवाई करावी.’’
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.