पुणे - समाविष्ट गावातील गंभीर होत जाणारा पायाभूत सुविधांचा प्रश्न, अपुऱ्या रस्त्यांमुळे होणारी वाहतूक कोंडी याची गंभीर दखल घेत या समस्या निवारणासाठी भरावी तरतूद करत महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी आज २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा तब्बल १३ हजार ९९५ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प स्थायी समितीपुढे सादर केला.
एकीकडे अर्थसंकल्पाचा आकडा गेल्यावर्षीच्या तुलनेत तब्बल १ हजार ३७७ कोटी रुपयांनी फुगलेला असताना दुसरीकडे उत्पन्न वाढवताना प्रशानसाची चांगलीच दमछाक होत आहे. हे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. त्यामुळे एकीकडे समस्यांचे रौद्ररूप अन दुसरीकडे उत्पन्न वाढीचे आव्हान अशा कात्रीत महापालिका सापडली आहे.
महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी आज स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांच्याकडे अर्थसंकल्प सादर केला. यावेळी महापौर मंजूषा नागपुरे, उपमहापौर परशुराम वाडेकर, सभागृहनेते गणेश बिडकर, अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर, पृथ्वीराज बी. पी., नगरसचिव योगिता भोसले, मुख्यलेखा परिक्षक उल्का कळसकर यावेळी उपस्थित होते.
अर्थसंकल्प सादर करताना आयुक्त नवल किशोर राम म्हणाले, ‘कोरोनाच्या काळात मी पुण्यात जिल्हाधिकारी म्हणून काम केले आहे. पुणेकरांच्या अपेक्षा काय आहेत? हे मला माहिती आहे. महापालिका आयुक्त म्हणून काम करताना त्याचाच विचार करून हा अर्थसंकल्प मांडत आहे. नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करणे हे कर्तव्य आहे असे.’
जानेवारीपर्यंत ७७०१ कोटीचे उत्पन्न
पुणे महापालिकेला २०२५-२६ या वर्षात १२ हजार ६१८ कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित होते. पण जानेवारी २०२६ अखेर यापैकी ७७०१ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. म्हणजे ३१ मार्च अखेरपर्यंत आणखी किमान एक हजार कोटी रुपये मिळाले तरी किमान गेल्यार्षीच्या अर्थसंकल्पात सुमारे ४ हजार कोटी रुपयांची तूट राहणार आहे.
महापालिकेने मिळकतकराची अभय योजना राबवून देखील उत्पन्न वाढीत मोठी झेप घेता आलेली नाही. त्यामुळे आयुक्तांच्या अर्थसंकल्पाचा आकडा १४ हजार कोटीच्या जवळ गेलेला असला तरी उत्पन्न वाढवणार कसे असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
पथच्या भांडवली खर्च वाढवला
आयुक्तांनी अर्थसंकल्पात पथ विभागासाठी एकूण तरतूद १८६६.३९ कोटीची तरतूद केली आहे. यामध्ये भांडवली कामासाठी १५०५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. तर महसुली कामावर ३६१.३९ कोटी रुपये तरतूद केली आहे. गेल्यावर्षीच्या अर्थसंकल्पातील तुलनेत यंदा महसुली खर्च १३९ कोटी रुपयांनी कमी केला आहे. तर भांडवली खर्च ३८२ कोटी रुपयांनी वाढवला आहे.
शहरातील रस्ते डांबरीकरण करणे, चेंबर उचलणे, नवीन रस्त्यांचे प्रमाण वाढवणे यावर भर दिल्याने भांडवली खर्चाची तरतूद वाढली आहे. यामध्ये समाविष्ट गावातील रस्त्यासाठी ११० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
महत्त्वाच्या तरतुदी
पाणी पुरवठा
- बावधन, सूस म्हाळुंगे, लोहगाव, वाघोली या गावांसाठी पाणी पुरवठ्याची योजना
- बावधन येथे ५ पाण्याच्या टाक्या उभारणे, ३५ किलोमीटरची जलवाहिनी टाकणे
- सूस म्हाळुंगे येथे ६ टाक्या व ७७ किलोमीटरची जलवाहिनी टाकने
- शेवाळवाडी येथे २३.५० किलोमीटर, मुंढवा केशवनगर येथे १६.५० किलोमीटरची जलवाहिनी टाकणे
मलनिस्सारण विभाग
- शहरात सुमारे १०० किमी लांबीच्या मलवाहिन्या टाकण्याचे नियोजन आहे.
- सांडपाणी देखभाल, नाले सफाई व पावसाळी लाइन स्वच्छतेसाठी निधी तरतूद.
-पावसाळ्यात पाणी साचणाऱ्या ठिकाणी उपाययोजना करण्यासाठी निधी प्रस्तावित.
- नाल्यांच्या कडेला सीमाभिंत बांधण्याचे काम प्रस्तावित.
- नव्याने समाविष्ट २३ गावांमध्ये सांडपाणी वाहिनी टाकण्यासाठी अमृत दोनमध्ये प्रकल्प
- मलशुद्धीकरण प्रकल्पाची क्षमता वाढविण्यासाठी अमृत दोनमधून ८४२.८५ कोटी रुपयांचा आराखडा किंमत आहे.
- समाविष्ट गावांसाठी सांडपाणी व्यवस्थापनासाठी ३२३.७६ कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित.
डिजिटल प्रशासन
- महानगरपालिकेच्या १२ विभागांतील ११७ सेवा ऑनलाइन उपलब्ध आहेत.
- भविष्यात आणखी सेवा डिजिटल माध्यमातून उपलब्ध करण्याचे नियोजन.
- इ साइन द्वारे प्रमाणपत्रे व परवाने पूर्णपणे ऑनलाइन देण्याची योजना.
- डीबीटी पोर्टल, वॉट्सॲप चाटबॉट, पीएमसी केअर प्लॅटफॉर्म अद्ययावत करणार
आपत्ती व्यवस्थापन विभाग
- शहरात वाढत्या हवामान बदलामुळे आपत्ती व्यवस्थापनावर विशेष भर.
- आपत्ती व्यवस्थापन विभागासाठी सुमारे ६२.०३ कोटी रुपयांची तरतूद.
- आपत्कालीन परिस्थितीत त्वरित प्रतिसाद देण्यासाठी यंत्रणा मजबूत करणे.
- नागरिकांचे संरक्षण आणि नुकसान कमी करण्यासाठी योजना.
- प्रशिक्षण व संसाधनांचा विकास करण्यावर भर.
शिक्षण विभाग
- इंग्रजी माध्यम शाळांमध्ये आणखी १० माध्यमिक वर्ग सुरू करण्याचा प्रस्ताव.
- शाळांमध्ये स्वच्छतागृहांचे यांत्रिकीकरण करून स्वच्छता सुधारणा.
- शाळांच्या पायाभूत सुविधांचा विकास.
- विद्यार्थ्यांसाठी चांगल्या शैक्षणिक सुविधा निर्माण करण्यावर भर.
- शिक्षणाच्या गुणवत्तेत वाढ करण्याचे उद्दिष्ट.
प्रकल्पांसाठी तरतूद
- घोरपडी रेल्वे पूल, आगाखान नदीवरील पूल, सनसिटी–कर्वेनगर नदीवरील पूल पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन.
- साधू वासवानी पूल आणि विश्रांतवाडी उड्डाणपूल कामे पूर्ण होण्यासाठी ऑगस्ट २०२६ पर्यंत कालावधी लागू शकतो.
- शास्त्रीनगर उड्डाणपूल, बिंदू माधव ठाकरे चौक उड्डाणपूल, सेनापती बापट चौक उड्डाणपूल पुढील दोन वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन.
- मुंढवा चौक उड्डाणपूल आणि शिवणे–नांदेड सिटी नदीवरील पूल पुढील वर्षात सुरू करणार
- शहरातील उड्डाणपूल, पूल, सबवे, अंडरपास अशा ९९ प्रमुख संरचनांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येणार.
- नगर रस्ता, सोलापूर रस्त्यावर भुयारी मार्ग बांधण्यासाठी १० कोटी रुपयांची तरतूद
- पुण्यात रस्त्यांचे जाळे १० टक्केपेक्षा कमी असून, ते वर्षभरात १०.७५ टक्के वाढवण्याचे नियोजन
- वाहतूक कोंडी लक्षात घेऊन महत्त्वाच्या रस्त्यांचे नियोजन आणि सुधारणा प्रस्तावित.
- मेट्रो मार्गावरील ॲमेनिटी स्पेसमध्ये पार्किंग विकसित करण्यासाठी ५ कोटीची तरतूद.
- पंतप्रधान आवास योजनेसाठी ७५ कोटी रुपयांची तरतूद.
- हडपसर आणि वडगाव भागात ६ प्रकल्पांतून सुमारे ४ हजार ७२५ घरे बांधण्याचे उद्दिष्ट
- घनकचरा विभाग व पाणी व्यवस्थापनासाठी १५ व्या वित्त आयोगातून ४५८ कोटी रुपये निधी
- उद्यान विभागातर्फे रिव्हर बँक बायोडायव्हरसिटी पार्क
- शहरातील तलावांमध्ये सौरऊर्जेवर कारंजे बसविण्यासाठी ५ कोटीची तरतूद.
अपेक्षित उत्पन्न
जमेची बाजू (उत्पन्न)- रक्कम (कोटी रुपयांमध्ये)
स्थानिक संस्था कर - ८४५.३२
वस्तू व सेवा कर -२,९१७.९५
मिळकतकर - ३,१५२.४०
बांधकाम शुल्क -३,४०६.८६
पाणीपट्टी - ७४१
शासकीय अनुदान - ९३४.३४
इतर जमा- १,२०३.६९
कर्जरोखे -५००
पंतप्रधान आवास योजना -९३
एकूण जमा - १३,९९५
अपेक्षित खर्च - रक्कम (कोटी रुपयांमध्ये)
सेवक वर्ग खर्च - ३,८८१.७०
वीज खर्च व दुरुस्ती - ५७०.४१
पाणी खर्च -१९०
कर्ज परतफेड, व्याज व घसारा - १४८.०१
औषधे, पेट्रोल व डिझेल - ३१९.६९
देखभाल दुरुस्ती व इतर खर्च - २,७२२.१९
वॉर्ड स्तरीय कामे - ३४
क्षेत्रीय कार्यालयांची कामे - १३७.९४
भांडवली व विकासाची कामे - ५,७७३.५४
अमृत व स्मार्ट सिटी अभियान - २१७.५०
एकूण खर्च - १३,९९५
विभागनिहाय तरतूद (रक्कम कोटी रुपयांमध्ये)
पाणीपुरवठा विभाग: २,०१७.४३
मलनिःसारण प्रकल्प: १,२१६.४८
घनकचरा व्यवस्थापन: १,३९०.३९
आरोग्य विभाग: ८८१.७४
नगर रचना नियोजन: ५४.५०
वाहतूक नियोजन व प्रकल्प: ७४०.४०
पथ विभाग : १,८६६.३९
पीएमपी : ५९२.२२
उद्यान विभाग: २०५.७६
पर्यावरण विभाग: ५१.५९
विद्युत विभाग: २६५.७२
भवन रचना विभाग: ६५०.४४
माहिती तंत्रज्ञान विभाग: ५६.७३
हेरिटेज सेल: ३३.८०
प्राथमिक शिक्षण विभाग: ९७९.८३
आपत्ती व्यवस्थापन: ६२.०३
समाज विकास विभाग: १४३.५०
मोटार वाहन विभाग: १५२.६५
सांस्कृतिक केंद्र विभाग: १७१.३१
असा येणारा रुपया (उत्पन्न टक्केवारी) -
वस्तू व सेवा करः २७
मिळकतकर: २४
शहर विकास शुल्क: २४ इतर जमा: ९
शासकीय अनुदान: ६
पाणीपट्टी: ५
रोखे: ३
अमृत, स्मार्ट सिटी व पंतप्रधान आवास योजना: १
इतर: १
असा जाणार रुपया (खर्च टक्केवारी):
विकास कामे व प्रकल्प: ४०
सेवक वर्ग : २८
घसारा, पेट्रोल, औषधे व देखभाल दुरुस्ती: २२
वीज खर्च व दुरुस्ती: ४
अमृत, स्मार्ट सिटी व पंतप्रधान आवास योजना: २
पाणी खर्च: १
कर्ज परतफेड व व्याज: १
वॉर्ड स्तरीय कामे: १
क्षेत्रीय कार्यालयांची कामे: १
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.