Iran Israel War : आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू असलेल्या इराण-इस्रायल-अमेरिका संघर्षाचा परिणाम आता भारतातील हॉटेल उद्योगावरही दिसू लागला आहे. इराण-इस्रायल-अमेरिका संघर्षामुळे गॅसचा तुटवडा निर्माण झाला असून मुंबईतील जवळपास 20 टक्के हॉटेल्स बंद ठेवण्यात आली आहेत, अशी माहिती आहार (Association of Hotels and Restaurants Mumbai) या संघटनेने दिली आहे. हा तुटवडा तुटवडा कायम राहिल्यास येत्या तीन दिवसात 50 टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गॅसचा तुटवडा आणखी काही दिवस कायम राहिल्यास परिस्थिती गंभीर होऊ शकते. पुढील तीन दिवसही गॅस पुरवठा सुरळीत झाला नाही, तर मुंबईतील सुमारे 50 टक्के हॉटेल्स बंद करण्याची वेळ येऊ शकते, असा इशारा आहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
मध्यपूर्वेत सुरू असलेल्या संघर्षामुळे गॅस पुरवठा साखळीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे देशभरात आणि राज्यातही गॅसचा तुटवडा जाणवू लागला आहे. मुंबईत हॉटेल व्यवसाय मोठ्या प्रमाणावर एलपीजी आणि कमर्शियल गॅसवर अवलंबून असल्याने या तुटवड्याचा थेट परिणाम हॉटेल उद्योगावर होत आहे.
या समस्येबाबत आहार संघटना केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांशी संवाद साधत आहे. तसेच राज्यातील अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची मंगळवारी संघटनेचे प्रतिनिधी भेट घेणार असून गॅस पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली जाणार आहे.
दरम्यान, गॅसच्या तुटवड्याचा फटका इतर शहरांनाही बसत आहे. बंगळुरू हॉटेल असोसिएशननेही मंगळवारपासून काही हॉटेल्स बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर आली आहे. गॅसचा पुरेसा पुरवठा होत नसल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर गॅसचा पुरवठा लवकर सुरळीत झाला नाही, तर देशातील हॉटेल उद्योगासमोर मोठे संकट उभे राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पश्चिम आशियातील सुरू असलेल्या संघर्षाचे चटके आता महाराष्ट्रातील उद्योगधंद्यांना बसू लागले आहेत. कतारने द्रवीकृत नैसर्गिक वायू अर्थात एलएनजीचं उत्पादन थांबवल्याने, भारताला होणारा पुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील उद्योगधंदे गॅसवर गेले. छ. संभाजीनगरमध्ये एलएनजीच्या तुटवड्याचा अनेक उद्योगांना फटका बसला असून, एलएनजीअभावी 5 मोठ्या उद्योगांचं उत्पादन ठप्प झालं आहे. एमआयडीसीमधील आणखी उद्योग ठप्प होण्याची शक्यता आहे.
ऑटो इंडस्ट्री, फार्मा कंपन्यांना एलएनजी तुटवड्याचा मोठा फटका बसत आहे. एमआयडीसीला दररोज 250 ते 300 मेट्रिक टन एलएनजीची गरज आहे. मात्र युद्धामुळे तो विस्कळीत झाल्याचं दिसतंय. दरम्यान शेंद्रा, वाळूज, चिखलठाण्यातही ऑटोमोबाईललाही गॅस तुटवड्याचा फटका बसत आहे. याशिवाय एलएनजीच्या तुटवड्यामुळे स्टील कंपनीत युनिट बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.