नसरापूर - भोर तालुक्यातील हातवे- तांभाड रस्त्यावर भरधाव डंपरने दुचाकीला मागून ठोकरल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील आजोबा व नातीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने तांभाड गावावर शोककळा पसरली होती. शिवाजी नामदेव शिळीमकर (वय ६९) व त्यांची नात तन्वी नितीन शिळीमकर (वय ९, सध्या रा. पुणे; मूळगाव तांभाड) या दोघांचा या अपघातात मृत्यू झाला.
शनिवारी (ता. १४) सकाळी शिवाजी शिळीमकर व त्यांची नात तन्वी हे दोघे दुचाकीवरून (क्र. एम.एच. २८ ए.डी. ३१३६) गावाला तांभाडकडे जात होते. त्यावेळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास हातवे- तांभाड रस्त्यावर हातवे- देऊळवाडी येथे त्यांच्या मागून येणाऱ्या भरधाव डंपरने (क्र.एम.एच. १४ एच.यू. ३७७७) त्यांच्या दुचाकीला मागून जोरदार ठोकर मारली.
या अपघातात शिवाजी व तन्वी हे गंभीर जखमी झाले. परिसरातील नागरिकांनी त्यांना तातडीने नसरापूर येथील खासगी रुग्णालयात आणले, परंतु उपचारापूर्वीचे त्यांचा मृत्यू झाला होता.
राजगड पोलिस ठाण्यात या अपघाताबाबत सुधाकर वसंत शिळीमकर (वय ५२, रा. नसरापूर; मूळगाव तांभाड) यांनी फिर्याद दिली. भरधाव डंपर चालवून अपघातास व दोघांच्या मृत्यूस जबाबदार झाल्याप्रकरणी डंपर चालक आकाश शिवाजी भुसने याच्यावर गुन्हा दाखल करून त्यास पोलिसांनी ताब्यात घेतले. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक तुकाराम राठोड करत आहेत.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.