- रविंद्र गायकवाड
बिडकीन - पैठण तालुक्यातील बिडकीनजवळील जुन्या लाखेगाव रस्त्यावरील भगवती माता मंदिरासमोरील शेतातील विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या २६ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज दुपारी घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीती आणि हळहळ व्यक्त केली जात आहे.
मृत तरुणाचे नाव मनिष ईश्वर सरुळे (रा. नांदर, ता. पैठण, सध्या रा. शिंदे गल्ली, बिडकीन) असे असून तो आपल्या मित्रांसोबत डीएमआयसी परिसरातील शेतात पोहण्यासाठी गेला होता. मात्र, विहिरीतील पाण्याची खोली आणि अंदाज न आल्याने तो अचानक पाण्यात बुडाला. ही घटना मित्रांसमोरच घडल्याने एकच गोंधळ उडाला.
घटनेची माहिती मिळताच बिडकीन पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. सहायक पोलिस निरीक्षक निलेश शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पंचनामा सुरू करण्यात आला. दरम्यान, कांचनवाडी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.
विहीर अत्यंत खोल आणि पाण्याने भरलेली असल्याने बचावकार्य कठीण झाले होते. मात्र, अग्निशमन दलाच्या जवानांनी सुमारे ३० मिनिटांच्या अथक प्रयत्नांनंतर तरुणाचा मृतदेह बाहेर काढला. या घटनेने उपस्थित नागरिकांचा थरकाप उडाला.
मृतदेह पुढील तपासणीसाठी बिडकीन ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला असून शवविच्छेदन करत मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.बिडकीन पोलिस ठाणे येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलिस करत आहेत.
या बचावकार्यात मुख्य अग्निशमन अधिकारी अशोक एन. खांडेकर, उपअधिकारी व्ही. बी. कदम, गोरखनाथ जाधव,छगन सलामबाद, रितेश कसुरे, कमलेश सलामबाद, विश्वकर्मा रामा शंकर, मिलिंद पाचवणे यांच्यासह जवानांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
दरम्यान, या दुर्दैवी घटनेमुळे बिडकीन परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.