शिवाजीनगर - मयूर कॉलनी येथील एका खाजगी बांधकाम साइटवर सोमवारी (ता. १६) सकाळी साडेदहाच्या सुमारास एक डंपर येताना दिसला. त्या डंपरच्या समोरील काचेवर ‘पुणे मेट्रो’ आणि ‘पुणे मनपा सेवेसाठी’ असे दोन कागद चिकटवलेले होते. त्यामुळे खाजगी बांधकाम व्यावसायिकाच्या साइटवर मनपा सेवेसाठी असलेला हा डंपर कशासाठी वापरला जात आहे, असा प्रश्न नागरिकांना पडला.


नागरिकांनी या डंपरचा फोटो काढून, ‘सकाळ’च्या प्रतिनिधीकडे पाठवला. मात्र, डंपरच्या समोरील नंबर प्लेटवरील दोन अक्षरे दिसू नयेत, अशा प्रकारे त्यावर चिखल फासला होता.


दरम्यान, शिवाजीनगर येथील रेव्हेन्यू कॉलनीमध्ये सोमवारी (ता. १६) दुपारी पावणे दोनच्या सुमारास राडारोडा घेऊन, एक डंपर रस्त्यावरून जाताना दिसला. त्यातील राडारोडा न झाकता तो वेगाने रस्त्यावरून जात होता. विशेष म्हणजे, डंपरच्या समोरील नंबर प्लेटवर माती फासली होती.


मॉडेल कॉलनी येथील चतुःशृंगी मंदिराकडे जाणाऱ्या पदपथावर ६ मार्च रोजी सिमेंट काँक्रीट मिक्सर लावून काम सुरू करण्यात आले होते. महापालिका आणि पुणे मेट्रोच्या नावाचा वापर करून, खाजगी बांधकाम व्यावसायिकांच्या सोयीसाठी डंपर शहरात राजरोसपणे फिरत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.


वाहतूक पोलिसांच्या आशीर्वादाने वेगमर्यादा, वैध कागदपत्रे आणि इतर नियमांकडे दुर्लक्ष करून शहरात जड वाहतूक सुरू असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे. सर्वसामान्य नागरिकांनी हेल्मेट नसल्यास दंड आकारला जातो किंवा परवाना निलंबित करण्याची तंबी दिली जाते. मात्र, दुसरीकडे खुलेआम वाहतुकीचे नियम मोडून अवजड वाहतूक होत असताना वाहतूक पोलिसांना हे कसे दिसत नाही, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.


‘मयूर कॉलनी परिसरात वाहतूक पोलिसांना पाठवून संबंधित प्रकरणात कारवाई करण्यात येईल.'


- मनोज शेडगे, वाहतूक विभाग, कोथरूड


नंबर प्लेट स्पष्ट दिसत नसलेले वाहन चालवणे नियमबाह्य आहे. नियम मोडणाऱ्या वाहनांवर आम्ही सातत्याने कारवाई करत असतो. यापुढेही अशा वाहनांवर कारवाई केली जाईल.


- प्रमोद दोरकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक, वाहतूक विभाग, शिवाजीनगर


शहरात जड वाहतुकीचे नियम सर्रासपणे पायदळी तुडवले जात आहेत. धोकादायक पद्धतीने जड वाहतूक सुरू आहे. लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना चालण्यासाठीही रस्त्यावर जागा उरत नाही. वाहतूक पोलिसांच्या आशीर्वादाने हे सर्व सुरू असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. येत्या काळात यावर आळा घातला नाही, तर मोठे जनआंदोलन उभे केले जाईल.


- संदीप काळे, रहिवासी, मॉडेल कॉलनी

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.