पिंपरी - हिंजवडी आयटी पार्कला पुण्याशी जोडणारी आणि विशेषतः आयटी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची ठरणारी ‘मेट्रो मार्गिका-३’ चे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) महानगर आयुक्त डॉ.अभिजित चौधरी यांनी नुकतीच मेट्रोच्या कामाची ‘ऑन ग्राउंड’ पाहणी केली आणि कामाचा आढावा घेतला. हा टप्पा येत्या मे महिन्यापर्यंत पहिल्या टप्प्यात १२ स्थानके सुरू करण्याचे उद्दिष्ट पीएमआरडीए प्रशासनाने ठेवले आहे.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या सूचनांनंतर प्रकल्पाचे काम आता ‘मिशन मोड’वर सुरू झाले आहे. या अनुषंगाने ‘पीएमआरडीए’च्या औंध येथील कार्यालयात बुधवारी (ता.१८) बैठक झाली.


त्यानंतर गुरुवारी (ता. १९) सकाळी डॉ. चौधरी यांनी माण ते शिवाजीनगर या मार्गावरील २३ स्थानकांचा सविस्तर आढावा घेतला. त्यांनी २३.२ किलोमीटरच्या संपूर्ण मार्गिकेची पाहणी केली. यावेळी महानगर मुख्य अभियंता रिनाज पठाण आणि पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिलकुमार सैनी उपस्थित होते.


९४.२० टक्के काम पूर्ण


हिंजवडीतील वाहतूक कोंडी आणि खराब रस्ते यामुळे ही मेट्रो धावणे लवकरात लवकर आवश्यक आहे. मेट्रोमुळे खासगी वाहनांची संख्या कमी होऊन शिवाजीनगर ते हिंजवडी हे अंतर अवघ्या काही मिनिटांत पार करणे शक्य होणार आहे. सध्या प्रकल्पाचे ९४.२० टक्के काम पूर्ण झाले असून, सिग्नलिंगची तांत्रिक चाचणी सुरू आहे.


तसेच सुरक्षा विषयक तपासणी (सीएमआरएस) आणि तांत्रिक तपासणीची (सीडीआरएस) प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. पहिल्या टप्प्यात १२ स्थानके कार्यान्वित करण्यात येणार असून त्यादृष्टीने कामाला गती देण्याचे निर्देशही महानगर आयुक्तांनी दिले.


कामाचा वेग वाढवताना सुरक्षितता आणि गुणवत्तेशी कोणतीही तडजोड होऊ नये, अशा सूचना दिल्या आहेत. त्यादृष्टीने सर्व स्थानकांची प्रत्यक्ष पाहणी करून कामाला गती देण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकल्पासाठी ‘पीएमआरडीए’कडून सर्व आवश्यक सहकार्य तत्परतेने दिले जाईल.


- डॉ. अभिजित चौधरी, महानगर आयुक्त, पीएमआरडीए

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.