X/andharesushama नाशिकच्या अशोक खरातप्रकरणानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.
त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नावे राजीनाम्याचे पत्र लिहित ते राष्ट्रवादीच्या अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे सुपूर्द केले.
दरम्यान, स्वयंघोषित अंकशास्त्र तज्ज्ञ म्हणवून घेणाऱ्या 'कॅप्टन' अशोक खरात याला नाशिकच्या सरकारवाडा गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 17 मार्चला बलात्काराच्या आरोपाखाली अटक केली आहे.
परंतु या प्रकरणाने राज्याच्या राजकारणातही खळबळ उडाली आहे.
या प्रकरणानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावरही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. तसंच त्यांच्या अटकेचीही मागणी केली जात आहेत.
हे सर्व सुरू असतानाच रुपाली चाकणकर यांनी महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांना भेटून पत्र दिल्याची माहिती दिली आहे. अशोक खरात प्रकरणाचा सखोल व वस्तुनिष्ठ तपास व्हावा अशी मागणी त्यांनी केली आहे.
या पार्श्वभूमीवर रुपाली चाकणकर यांच्यावर नेमके काय आरोप होत आहेत? आणि त्यांचा राजकीय प्रवास कसा आहे? जाणून घेऊया.
सुषमा अंधारे यांनी काय आरोप केले?शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तसंच काही मागण्या केल्या आहेत.
सुषमा अंधारे म्हणाल्या, "रुपाली चाकणकर यांना तातडीने अटक केली पाहिजे ही माझी पहिली मागणी असेल. चाकणकर यांची समोरासमोर बसून चौकशी झाली पाहिजे, ही आमची दुसरी मागणी आहे."
चाकणकरांची नार्को टेस्ट झाली पाहिजे, अशीही मागणी सुषमा अंधारे यांनी केली.
चाकणकर स्वतः तंत्र मंत्र विद्या करत होत्या, असं एका पीडितीने सांगितल्याचं अंधारेंनी म्हटलं.
अनामिका कापण्याचा उल्लेख करत सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदेत रुपाली चाकणकर यांचा फोटो दाखवला आणि चाकणकर यांच्या अनामिकेला एक बँडेज आहे हेही त्यांनी या फोटोत दाखवलं.
तसंच हे फोटो सप्टेंबर महिन्यातले असल्याचा दावाही अंधारे यांनी केला.
Facebook/Sushma Andhare शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या, "खरात यांनी स्थापन केलेल्या संस्थेवर चाकणकर संचालक म्हणून काम करतात." पुढे अंधारे म्हणाल्या, "नंतर लक्षात आलं की, 2 सप्टेंबर 2024 ला समवती अमावस्या होती. ज्यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदी बसवलं आहे त्या 2 सप्टेंबर 2024 ला सोमवती अमावस्येच्यादिवशी स्वतःची अनामिका कापून अशापद्धतीची तंत्रमंत्र विद्या करतात. मला असं वाटतं की, गृहमंत्री कदाचित या प्रकरणी कोणालाही सोडणार नाहीत."
"जर गृहमंत्री खरंच महाराष्ट्रातल्या बहिणींचे लाडके भाऊ असतील आणि लाडक्या बहिणींचं अशाप्रकारे लैंगिक शोषण होत असताना लिंग पिसाट माणसाला महिला आयोगाची अध्यक्षाच पाठिशी घालत असेल, तर मला वाटत नाही की, अशा महिलेला राज्याचे गृहमंत्री पाठिशी घालतील."
गृहमंत्र्यांनी यावर तात्काळ कारवाई केली पाहीजे, अशी मागणीही अंधारे यांनी केली.
काँग्रेस नेते आणि माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं, "महिला आयोगाच्या अध्यक्षाच जर भोंदू बाबाचे पाय धुताना दिसत असतील, तर राज्यातील महिलांनी कोणाकडून न्यायाची अपेक्षा ठेवायची? खरातच्या पेन ड्राईव्हमध्ये 56 व्हीडिओ सापडले आहेत, हे धक्कादायक आहे."
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानीया यांनीही रुपाली चाकणकर यांची हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी काय म्हटलं?राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं, "तपासात जे जे याप्रकरणी त्यांच्यासोबत सहभागी असल्याचं निश्चितपणे समोर येईल, त्यांच्यावर तातडीने आणि सक्तीने कारवाई केली गेली पाहिजे. काही राजकीय लोकांचं नाव त्यांच्याशी जोडलं गेलं आहे. नक्कीच राष्ट्रवादी म्हणून आम्ही योग्य कारवाई करणार. ते येणाऱ्या 2-3 दिवसांमध्ये तुम्हाला दिसेल."
BBC प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले, "नाशिकच्या खरात प्रकरणाच्या अनुषंगाने जी काही माहिती बाहेर येते आहे, ती उद्विग्न करणारी आहे. देवाच्या आणि श्रद्धेच्या नावाने अशा काही गोष्टी होतील अशी कल्पना मी किंवा कोणीच कधीही करू शकत नाही."
"सार्वजनिक जीवनात वावरताना प्रत्येकाचाच अनेक व्यक्तींशी तसेच संस्थांशी संपर्क येतो. अनेकदा या संपर्काचे स्वरूप थेट स्वरूपाचे असतेच असे नाही. परंतु याचा अर्थ असा नाही की, एखादे गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या व्यक्तीला पाठीशी घातले जाईल."
"उलट या प्रकरणातील पीडितांनी समोर येऊन पोलिसात तक्रार नोंदवावी. आमचे सरकार या प्रकरणात ठाम भूमिका घेऊन दोषींवर कठोरात कठोर कारवाई करेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीनेही या प्रकरणाच्या निष्पक्ष तपासाच्या दृष्टीने काय पावलं उचलायला हवीत ती आम्ही उचलू," असं मत तटकरेंनी व्यक्त केलं.
रुपाली चाकणकर यांनी काय म्हटलं?महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी 18 मार्चला एक्स सोशल मीडियावर पोस्ट करत प्रतिक्रिया दिली.
यात त्यांनी म्हटलं, "शिवनिका संस्थान ट्रस्ट हे महादेव देवस्थानचे ट्रस्ट असून काहीवेळा तिथे सामाजिक कार्यक्रम साजरे होतात. त्यामुळे सामाजिक कामांच्या निमित्ताने आम्ही अनेक जण ट्रस्टच्या कामाशी जोडले गेलो होतो."
"यात समाजातील अनेक प्रतिष्ठित व्यक्ती आहेत. कॅप्टन खरात यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत किंवा त्यांच्यावर झालेल्या आरोपांबाबत मला कल्पना नाही. आता जे आरोप होत आहेत त्याबाबत पोलीस निष्पक्षपणे चौकशी करतील. पोलीस तपासावर माझा पूर्ण विश्वास आहे."
सुषमा अंधारे यांच्या आरोपांवर प्रतिक्रियेसाठी रुपाली चाकणकर यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांच्याकडून अद्याप प्रतिक्रिया मिळू शकलेला नाही.
रुपाली चाकणकर या प्रामुख्याने 2019 नंतर राज्याच्या राजकारणात दिसू लागल्या.
भाजपच्या नेत्या आणि त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष असलेल्या चित्रा वाघ यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर रुपाली चाकणकर यांना महिला प्रदेशाध्यक्षपदी पक्षाकडून नियुक्त करण्यात आलं होतं. तोपर्यंत त्या पुणे शहरात राजकीय किंवा सामाजिकदृष्ट्या सक्रिय होत्या.
रुपाली चाकणकर या मूळच्या दौंडमधल्या. रयत शिक्षण संस्थेमध्ये साधना महाविद्यालयातून त्यांनी शिक्षण घेतलं.
लग्नानंतर चाकणकर कुटुंबात आल्यानंतर त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला.
2002 मध्ये पुणे महानगरपालिका निवडणुकीत त्यांच्या सासु रुक्मिणी चाकणकर या निवडून आल्या.
@NcpRupaliChakankar रुपाली चाकणकर 2007 मध्ये रुपाली चाकणकरांना पुणे शहरात बचत गटांसंदर्भातील कामासाठी म्हणून पुरस्कार मिळाला होता.
2008 मध्ये त्यांनी पक्षाच्यावतीने खडकवासला विधानसभा मतदार संघाच्या अध्यक्षपदाची धुरा स्वीकारली.
पुणे शहरात त्यांनी 'स्वच्छंदी भरारी अभियान' शहरातील शाळा आणि काॅलेज मध्ये राबवला. त्यानंतर त्यांना पक्षाच्या महिला संघटनेवरही काम करण्याची संधी मिळाली.
पुणे शहराच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शहराध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलं.
यानंतर 2019 मध्ये राष्ट्रवादीच्या तत्कालीन महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
त्यावेळी रुपाली चाकणकर यांची महिला प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली. त्यावेळी रुपाली चाकणकर यांना राज्याच्या राजकारणात स्थान मिळालं.
पण ही निवड होण्याच्या काही दिवस आधीच चाकणकर यांना पुणे शहराध्यक्ष पदावरून तडकाफडकी काढून टाकण्यात आलं होतं. त्याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. पण त्यानंतर अचानक महिला प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेकांना आश्चर्य वाटलं होतं.
ऑक्टोबर 2021 मध्ये रुपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी वर्णी लागली. त्यानंतर 2024 मध्ये पुन्हा अध्यक्ष पदावर त्यांना संधी देण्यात आली होती.
चाकणकर आणि टीकारुपाली चाकणकर यांनी तत्कालीन सरकारविरोधात केलेल्या आंदोलनांमुळे त्यांच्यावर 12 गुन्हे दाखल आहेत. महिला प्रदेशाध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर त्यांनी विविध नेत्यांवर केलेल्या बोचर्या टीकांमुळे त्या चर्चेत राहील्या.
सुरुवातीलाच त्यांनी 'चित्रा वाघ यांनी पळून जाण्याची भूमिका का स्वीकारली?' असा प्रश्न विचारला होता.
त्यावर चित्रा वाघ म्हणाल्या होत्या, "मी राष्ट्रवादीची महिला प्रदेशाध्यक्ष असताना रूपाली चाकणकर यांना पुणे शहराध्यक्षपदावरून तडकाफडकी काढून टाकण्यात आलं होतं. मी त्यावेळी तिच्या पाठीशी उभी राहिले होते. मी राजीनामा दिल्यामुळे ती महिला प्रदेशाध्यक्ष झाली हे तिने विसरू नये."
त्याचबरोबर अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांबाबत चित्रा वाघ यांनी टीका केली असता, "ज्यांचा नवरा भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यात अडकला आहे त्यांना बोलण्याचा काय अधिकार," अशी बोचरी टीका चाकणकर यांनी चित्रा वाघ यांच्यावर केली होती.
@NcpRupaliChakankar रूपाली चाकणकर त्या दरम्यान प्रविण दरेकर यांनी सुरेखा पुणेकर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यावर बोलताना चाकणकर यांनी' दरेकर माफी मागा, नाहीतर गाल आणि थोबाड रंगवू' असा इशारा प्रविण दरेकर यांना दिला होता.
अमृता फडणवीस यांनी भ्रष्टाचारावरून महाविकास आघाडी सरकारवर टीका केली होती. त्याला उत्तर देताना रूपाली चाकणकर यांनी म्हटलं होतं, "ज्यांच्या गाण्याचा सूरांशी कधी ताळमेळ नसतो, तसाच त्यांच्या बोलण्यातही नसतो."
धनंजय मुंडे यांच्यावर करूणा शर्मा यांनी केलेले आरोप किंवा पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी संजय राठोड यांच्यावर झालेले आरोप असोत याबाबत मात्र रूपाली चाकणकर यांनी मौन बाळगल्याचा आरोप करत विरोधी पक्ष असलेल्या भाजपने त्यांच्यावर जोरदार टीका केली होती.
एकूणच काय तर रुपाली चाकणकर यांची संपूर्ण कारकीर्द वादांनी वेढलेली राहिली आहे. आता अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांना त्यांच्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचाही राजीनामा द्यावा लागला आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.