नाशिक : भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणात आता राजकारण्यांच्या नंतर शासकीय अधिकारी अडचणीत आल्याचं दिसून आलं. या प्रकरणात आता मुंबईत उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याची बदली करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. अभिजीत भांडे पाटील असं त्या अधिकाऱ्याचं नाव आहे. त्यांची प्रतिनियुक्ती संपुष्टात आणून मंत्रालयात बदली करण्यात आली आहे.


शेकडो महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेल्या अशोक खरातमुळे रुपाली चाकणकर यांच्यासह अनेक राजकारणी अडचणीत आल्याची चर्चा आहे. या प्रकरणात संबंधित सर्वांची चौकशी करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. तसेच या प्रकरणात कुणालाही सोडणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला. त्यानंतर आता प्रशासकीय अधिकारी अडचणीत आले आहेत.


अशोक खरातशी असलेले संबंध उघडकीस


अभिजीत भांडे पाटील हे उपजिल्हाधिकारी पदावर कार्यरत असून त्यांचे अशोक खरातशी असलेले संबंध समोर आले आहेत. अशोक खरातच्या मुलीच्या आणि पत्नीच्या नावे असलेल्या जमिनीमध्ये गुंतवणूक केल्याप्रकरणी आता त्यांची अडचण वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 


अशोक खरातशी संबंधित अनेक कामांमध्ये अभिजीत भांडे पाटील यांची गुंतवणूक असल्याचा आरोप केला जात आहे. आता त्यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईनंतर खरातशी संबंधित इतर महसूल अधिकाऱ्यांचे धाबे दणाणल्याची चर्चा आहे. 


याआधी अशोक खरात प्रकरणाशी संबंध आल्यानंतर राष्टवादीच्या नेत्या रुपाली चाकणकरांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. रुपाली चाकणकर या अशोक खरातच्या संबंधित एका ट्रस्टच्या संचालिका होत्या. त्यामुळे या प्रकरणात आता त्यांची चौकशीही केली जाणार आहे. 


नऊ लाखांचं मध, खरातचा नवा कारनामा 


वासनांध अशोक खरातच्या नव्या बनवाबनवीची माहिती समोर आली आहे. चिंचोके, बनावट खडे, नकली नाग अशा अनेक भुलथापा मारत खरातनं अंधश्रद्धेच्या आहारी जाणाऱ्या अनेकांना लाखोंचा गंडा घातल्याचं समोर आलं. याच भोंदू खरातनं 1 किलो मधाची बाटली चक्क 9 लाखांना विकल्याची धक्कादायक माहिती समोर आली. हे मध कामोत्तेजक आणि शक्तिवर्धक असल्याच्या भुलथापा त्यानं मारल्या आणि लाखोंच्या घरात ही मधाची बाटली विकली. 


लैंगिक अडचणी घेऊन येणाऱ्यांना हे मध विकलं जायचं. एल्विश हनीच्या नावाखाली विकलं जाणारं हे मध तुर्कीच्या समुद्रातील खोल गुहेतून मिळत असल्याचा बनाव खरात करायचा. हेच मध विकून त्यातून मिळवलेली रक्कम ट्रस्टच्या नावे घेत ब्लॅकमनी व्हाईट केल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं.


ही बातमी वाचा :


Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.