उमरगा (जि धाराशिव ): चोरट्यांनी विकलेले सोने हस्तगत करण्यासाठी आलेल्या कर्नाटक पोलिसांशी उमरगा शहरातील सराफ व्यापाऱ्यांचा मोठा वाद झाल्याची घटना मंगळवारी (ता. २४) दुपारी घडली. या वादामुळे शहरातील सराफ बाजार पेठेत काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर उमरगा पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर हा वाद शांत झाला.


कर्नाटक राज्यातील गदग जिल्ह्यातील बेटागिरी येथील एका चोरीच्या प्रकरणात पोलिसांनी दोन संशयित चोरट्याला ताब्यात घेतले होते. तपासादरम्यान, चोरट्याने चोरीचे सोने उमरगा येथील एका सराफ व्यापाऱ्याकडे विकल्याची कबुली दिली होती. या माहितीच्या आधारे कर्नाटक पोलीस अधिकारी मंगळवारी सकाळी उमरग्यात दाखल झाले. पोलीस संबंधित सराफ व्यापाऱ्याकडे गेले असता, व्यापाऱ्याने केवळ पाच ग्रॅम सोने घेतल्याचे सांगितले. मात्र, पोलिसांनी चोरट्याच्या जबाबाचा हवाला देत तेरा ग्रॅम सोन्याची मागणी केली. यावरून पोलीस आणि व्यापाऱ्यात शाब्दिक चकमक उडाली. उमरगा पोलीस ठाण्यात मध्यस्थी झाल्यानंतर व्यापाऱ्याने १३ ग्रॅम सोने पोलिसांच्या स्वाधीन केले.


गोल्ड लोन फायनान्सचा मुद्दा आणि वाढलेला तणाव


तपासाचा पुढचा टप्पा म्हणून कर्नाटक पोलिसांनी एका 'गोल्ड लोन फायनान्स' कंपनीकडे धाव घेतली. तिथेही चोरट्याने सोने गहाण ठेवल्याचा पोलिसांचा दावा होता. मात्र, येथे वाद अधिकच चिघळला. व्यापारी महासंघाचे माजी अध्यक्ष सिद्रामप्पा चिंचोळे यांच्यासह सराफ व्यापारी मोठ्या संख्येने एकवटले. आक्रमक झालेल्या व्यापाऱ्यांनी कर्नाटक पोलिसांनी आणलेली खासगी कार अडवण्याचा प्रयत्न केला.


दरम्यान परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून उमरगा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गजानन पुजारवाड व अन्य सहकाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप केला. त्यांनी व्यापाऱ्यांची समजूत काढून वाद मिटवला. यापूर्वीही कर्नाटक पोलीस आणि उमरगा सराफ व्यापाऱ्यांमध्ये चोरीच्या सोन्यावरून वादाचे प्रकार घडले आहेत. एवढे नक्की की, चोरट्या कडून सराफ व्यापारी सोने घेतात हे आजच्या प्रकरणामुन समोर आले आहे.


"चोरीच्या प्रकरणांचा तपास करताना व्यापाऱ्यांनी कायद्याला धरून पोलिसांना सहकार्य करावे, जेणेकरून तपासात पारदर्शकता राहील." - प्रल्हाद सुर्यवंशी पोलीस निरीक्षक उमरगा

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.