फुलंब्री : सोशल मीडियावर करण्यात आलेल्या वक्तव्यामुळे फुलंब्री तालुक्यात राजकीय वातावरण ढवळून निघाले असून, सरपंच मंगेश साबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत तालुका दंडाधिकारी तथा तहसील कार्यालय फुलंब्री व वडोद बाजार पोलीस ठाण्यात येथे लेखी तक्रार देण्यात आली आहे.
भाजपचे तालुका सरचिटणीस राजू तुपे यांनी तक्रारीत म्हटले की, २४ मार्च २०२६ रोजी दुपारी मंगेश साबळे यांनी फेसबुकवर लाईव्ह करत आमदार अनुराधाताई चव्हाण यांच्याबाबत आक्षेपार्ह शब्दांचा वापर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच त्या लाईव्हमध्ये शिवीगाळ करत धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
फुलंब्री तालुक्यात नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार अनुराधाताई चव्हाण यांनी तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी तसेच महसूल विभागातील कर्मचाऱ्यांसह विविध गावांमध्ये जाऊन शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली होती. मात्र या पाहणीबाबत सोशल मीडियावर चुकीची माहिती देत आमदार चव्हाण यांच्यावर टीका करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. फेसबुक लाईव्हमध्ये वापरण्यात आलेली भाषा ही लोकप्रतिनिधींचा अवमान करणारी असून, अशा प्रकारच्या वक्तव्यामुळे समाजात गैरसमज पसरू शकतात तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित व्यक्तीवर तात्काळ गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजपच्या वतीने प्रशासनाकडे करण्यात आली आहे. यानिवेदनावर जिल्हा परिषद सदस्य गोपाल वाघ, गणोरी मंडळ प्रमुख सुचित बोरसे, कल्याण चव्हाण, शिवाजी पाथ्रीकर, राजू तुपे, योगेश मिसाळ, मयूर कोलते, जनार्दन तुपे, गजानन बोकील, उमेश फलफले, राजू खैरनार, भाऊसाहेब साबळे, कृष्णा साबळे, विष्णू गाडेकर, राजेंद्र डकले, मनोज मुळे, वाल्मीक जाधव, गणेश राऊत, संतोष जाधव, रामेश्वर चोपडे, विजय आहेर, अरुण तुपे, विष्णू गाडेकर, रवींद्र पवार, पंढरीनाथ देवरे,पांडुरंग ब्राह्मणे, मच्छिंद्र तुपे यांच्यासह आदींच्या स्वाक्षरी आहे.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.