तंत्रज्ञानाच्या युगात ‘धूरमुक्त’ होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या गृहिणीला आज पुन्हा धुराशी झुंज द्यावी लागत आहे. इराण-इस्राईल युद्धाच्या पार्श्वभूमीवर गॅस पुरवठा कोलमडल्याने चुली पेटू लागल्या आहेत. गॅसपुरवठा वितरणात होणारा दुजाभाव ग्रामीण भागातील नागरिकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करत असून, सर्वसामान्यांचे बजेट पूर्णपणे कोलमडले आहे.
चाकण - व्यावसायिक गॅसचा पुरवठा गेल्या चार आठवड्यांपासून विस्कळित झाला आहे. याचा मोठा फटका चाकण शहर आणि औद्योगिक वसाहतीमधील सुमारे तीन हजार हॉटेल्स, ढाबे आणि कंपन्यांच्या कॅन्टीनला बसला असून अनेक व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.
चाकण औद्योगिक पट्ट्यात कामगारांची मोठी वर्दळ असते. मात्र, गॅस पुरवठा बंद झाल्याने आणि काळ्याबाजारात किमती भडकल्याने हॉटेल व्यावसायिकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. खर्च परवडत नसल्याने अनेक व्यावसायिकांनी मेनूमधून जास्त ऊर्जा लागणारे पदार्थ कमी केले आहेत, तर काहींनी हॉटेलच्या वेळा मर्यादित केल्या आहेत.
पर्यायी इंधन म्हणून लाकूड किंवा कोळशाचा वापर सुरू असला तरी, त्यामुळे खर्चात मोठी वाढ झाली आहे. छोट्या हातगाड्या आणि चायनीज फास्टफूड विक्रेत्यांना हा वाढीव खर्च ग्राहकांकडून वसूल करणे शक्य नसल्याने अनेकांनी आपले व्यवसाय तात्पुरते बंद ठेवणे पसंत केले आहे. गॅस टंचाईमुळे चाकणच्या हॉटेल उद्योगासमोर मोठे संकट उभे राहिले आहे.
‘आम्ही व्यावसायिक वापराचा गॅस बंद असल्यामुळे चुलांगणाचा वापर केला आहे. चुलीचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू आहे त्यामुळे हॉटेल सुरू आहेत. ‘स्थानिक व्यावसायिक संघटनांनी सरकारकडे गॅस दरात सवलत देण्याची मागणी केली आहे. जर अशीच परिस्थिती राहिली, तर अनेकांना व्यवसाय कायमचा बंद करावा लागेल,' अशी भीती हॉटेल मालक व्यक्त करत आहेत.
दृष्टिक्षेपात : व्यावसायिक सिलिंडर
1) चाकण परिसरात छोटी-मोठी हॉटेल : ३०००
2) यापूर्वी दररोज वितरण : १७ हजार
3) सध्या वितरण : पूर्णपणे बंद
4) शासकीय शाळा, इतर आस्थापनासाठी नियमानुसार वितरण, पण त्यालाही मर्यादा
चाकण औद्योगिक वसाहतीत सुमारे ६५ हजार कामगारांना आम्ही आजही जेवण देतो. व्यावसायिक वापराच्या गॅसच्या किमती वाढल्याने तसेच पुरवठा बंद असल्याने गेल्या चार आठवड्यांपासून आम्ही डिझेल शेगड्या तसेच विद्युत स्टोव्ह यांचा वापर सुरू केलेला आहे. जेवण देण्यात अडथळे निर्माण होत आहेत; परंतु आम्ही सेवा सुरू ठेवली आहे. कामगारांना जेवण काही ठिकाणी उपलब्ध नसल्याने कामगार गावी जात आहे, त्यामुळे औद्योगिक वसाहतीत परिणाम होत आहे.
- विजय बोत्रे, उद्योजक, चाकण
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.