• महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीत भाजपचा मोठा विजय


  • राष्ट्रवादी काँग्रेसला अपेक्षित यश मिळाले नाही


  • पक्षातील नेत्यांनीच नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले



राज्यातील २९ महानगरपालिकांची निवडणुकांमध्ये भाजपने ऐतिहासिक विजय मिळवत आपलं वर्चस्व सिद्ध केलं. राज्यातील २,८६९ पैक १,४२५ जागा जिंकून भाजप सर्वात मोठा पक्ष बनला. तर महायुतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीला मोठा फटका बसला आहे. राष्ट्रवादीची अनेक ठिकाणी साधारण कामगिरी झाली.


निवडणुकांच्या एक-दोन महिन्यानंतर आता पक्षातील एका बड्या नेत्यानं खदखद व्यक्त करत पराभव कुणामुळे झाला, कोण आहे जबाबदार असा सवाल केला आहे.अजित पवार गट राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष सलीम सारंग यांनी फेसबूक पोस्ट लिहत पक्षातील नेत्याना सवाल केला आहे.


आज हे लिहिताना मनात प्रचंड वेदना,बर्याच दिवसांपासून पक्षाबाबत आणि पक्षात होणाऱ्या अंतर्गत राजकारणाबद्दल काहीही बोललो नाही. अजित पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर तर बोलण्याची हिंमत नव्हती, मात्र आता शांत राहून चालणार नाही.अस्वस्थता आणि तितकीच जबाबदारीची जाणीव आहे. कारण हा केवळ टीकेसाठी लिहिलेला लेख नाही, तर पक्षाच्या अंतर्गत परिस्थितीबद्दल एक प्रामाणिक, आतून आलेला आवाज आहे.


राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही केवळ एक राजकीय संघटना नाही, तर अनेक कार्यकर्त्यांच्या आयुष्याचं ध्येय, त्यांच्या स्वप्नांची दिशा आणि समाजासाठी काहीतरी करण्याची उर्मी आहे. पण आज त्या उर्मीला कुठेतरी गुदमरल्यासारखं वाटतंय.पक्षाची ताकद पक्षाच्या तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये असते.हे कार्यकर्ते कोणत्याही अपेक्षेशिवाय, अनेकदा स्वतःच्या वेळेचा,पैशाचा आणि कुटुंबाच्या वेळेचा त्याग करून पक्षासाठी झटत असतात. मात्र, आजची वस्तुस्थिती वेगळी चित्र दाखवते.


खऱ्या अर्थाने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना बाजूला सारून, केवळ चापलुसी करणाऱ्या आणि 'होयबा' संस्कृतीला खतपाणी घालणाऱ्या व्यक्तींना महत्त्वाची पदं दिली जात आहेत. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. ज्यांनी वर्षानुवर्षे पक्षासाठी घाम गाळला, त्यांनाच आज दुर्लक्षित केलं जातंय, ही वेदना शब्दात मांडणं कठीण आहे.


पक्षाचा अल्पसंख्याक सेल आणि त्या माध्यमातून जोडलेला समाज, जो एकेकाळी पक्षाचा मजबूत आधारस्तंभ होता, आज पूर्णपणे उपेक्षित वाटतो आहे. संवादाचा अभाव, नेतृत्वाची अनुपस्थिती आणि ठोस कार्यक्रमांची कमतरता यामुळे अल्पसंख्याक समाजात पक्षाबद्दलची बांधिलकी कमकुवत होत चालली आहे. हा केवळ संघटनात्मक मुद्दा नाही, तर समाजाच्या विश्वासाचा प्रश्न आहे. पक्षाने या घटकाकडे दुर्लक्ष केल्यास, त्याचे दूरगामी परिणाम होणार हे स्पष्ट आहे. मग प्रश्न पडतो, हा दुर्लक्षाचा भाग आहे की जाणूनबुजून घेतलेली भूमिका?


अलीकडील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनी पक्षातील कमकुवत दुवे उघड केले. राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद स्तरावर पक्षाचा निकाल घसरलेला स्पष्ट दिसतो. भिवंडीसारख्या मुस्लिम बहुल भागात जिल्हाध्यक्ष म्हणून अल्पसंख्याक समाजातील सक्षम नेतृत्व देण्याऐवजी बाहेरील आणि असंबंधित व्यक्तींना जबाबदारी दिली जाते, ही चूक नाही का? नवी मुंबई, मीरा-भाईंदर, मुंबई, सोलापूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये अशीच परिस्थिती आहे.स्थानिक वास्तव समजून न घेता घेतलेले निर्णय पक्षाच्या मुळावर घाव घालत आहेत.


याहूनही गंभीर बाब म्हणजे काही नेत्यांकडे तीन-तीन, चार-चार पदे आहेत, पण या पदांचा उपयोग पक्षवाढीसाठी न करता फक्त स्वतःची प्रतिष्ठा मिरवण्यासाठी केला जात आहे.पक्षाला बळकटी देण्याऐवजी ही पदांची मक्तेदारी पक्षाला कमकुवत करत आहे,मग या अपयशाची नैतिक जबाबदारी अशा निष्क्रिय नेत्यांनी स्वीकारू नये का? त्यांनी राजीनामे दिले तर नव्या नेतृत्वाला संधी मिळेल आणि ते पक्षासाठी फायद्याचं असेल.


पक्षात दीर्घकाळ कार्यरत असलेल्या जुन्या आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून,बाहेरून येणाऱ्या आणि पक्षाशी कुठलाही संबंध नसलेल्या व्यक्तींना पदांची खैरात केली जात आहे.इतकेच नव्हे, तर इतर पक्षांतून आलेले लोकच आम्हाला आमच्या पक्षाची विचारधारा शिकवू लागले आहेत.हा निष्ठावंत कार्यकर्त्यांवर झालेला उघड अन्याय आहे. आता परिस्थिती अशी आहे की, अनेक आमदारांना स्वतःच्याच मतदारसंघातून नगरसेवकही निवडून आणता येत नाहीत. या सगळ्या परिस्थितीमध्ये सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो तो म्हणजे या हाराकिरीची जबाबदारी कोणाची?


प्रत्येक वेळी पराभवाचं खापर तळागाळातील कार्यकर्त्यांवर फोडणं सोपं असतं. पण धोरणात्मक चुका, चुकीचे निर्णय, आणि संघटनात्मक दुर्लक्ष यासाठी वरिष्ठ पातळीवर आत्मपरीक्षण होणं गरजेचं आहे. नेतृत्वाने केवळ आदेश देणं पुरेसं नाही, तर कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभं राहणं, त्यांच्या भावना समजून घेणं आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेणं ही त्यांची जबाबदारी आहे. कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेऊन काम करणारी पार्टीच भविष्यात कार्यकर्ते व जनतेसाठी सुरक्षित आणि सक्षम पर्याय म्हणून उभी राहील.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.