पुणे - शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेत अर्ज भरण्यास प्राथमिक शिक्षण विभागाने मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार पालकांना आता ३१ मार्चपर्यंत आपल्या पाल्यांचे ऑनलाइन अर्ज भरता येणार आहेत.
आरटीईनुसार २५ टक्के प्रवेशासाठी शिक्षण विभागाने एक किलोमीटरच्या अंतरातील शाळा निवडण्याची घातलेली अट उच्च न्यायालयाने रद्द केली. त्यानंतर प्राथमिक शिक्षण संचालनालयाने आधी अर्ज भरलेल्या पालकांना पुन्हा अर्ज भरण्यासाठी, तसेच अर्ज न भरलेल्या पालकांना अर्ज भरण्याची संधी दिली आहे.
प्राथमिक शिक्षण संचालनालयाने आरटीई संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी एक किलोमीटरची अट रद्द करण्यात आलेली आहे. त्यामुळे एक किलोमीटरच्या आतील शाळांची निवड करून अर्ज भरलेल्या पालकांना प्रवेशासाठी एक किलोमीटर, एक ते तीन किलोमीटर, तसेच तीन किलोमीटरपेक्षा अधिक अंतरावरील शाळा उपलब्ध झाल्या आहेत.
यंदा या प्रवेश प्रक्रियेसाठी राज्यातील आठ हजार ७०० शाळांमधून एक लाख १४ हजार ७८५ जागा प्रवेशासाठी उपलब्ध झाल्या आहेत. या प्रक्रियेत बुधवारी सायंकाळपर्यंत जवळपास दोन लाख ७६ हजार ९५४ अर्ज दाखल झाल्याची माहिती आरटीई प्रवेशाच्या संकेतस्थळावरील आकडेवारीवरून समोर आली.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.