महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठं अपयश आले आहे. यानंतर आता राष्ट्रवादीतील खदखद समोर आली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष सलीम सारंग यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे. यात त्यांनी एक खंत सांगितली आहे. यामुळे अंतर्गत वाद समोर आला आहे.


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष सलीम सारंग म्हणाले की, आज हे लिहिताना मनात प्रचंड वेदना, बर्याच दिवसांपासून पक्षाबाबत आणि पक्षात होणाऱ्या अंतर्गत राजकारणाबद्दल काहीही बोललो नाही. आदरणीय अजितदादा पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर तर बोलण्याची हिंमतच झाली नाही. मात्र आता शांत राहून चालणार नाही. अस्वस्थता आणि तितकीच जबाबदारीची जाणीव आहे. कारण हा केवळ टीकेसाठी लिहिलेला लेख नाही, तर पक्षाच्या अंतर्गत परिस्थितीबद्दल एक प्रामाणिक, आतून आलेला आवाज आहे.


ते म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही केवळ एक राजकीय संघटना नाही, तर अनेक कार्यकर्त्यांच्या आयुष्याचं ध्येय, त्यांच्या स्वप्नांची दिशा आणि समाजासाठी काहीतरी करण्याची उर्मी आहे. पण आज त्या उर्मीला कुठेतरी गुदमरल्यासारखं वाटतंय. पक्षाची खरी ताकद ही त्याच्या तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये असते. हे कार्यकर्ते कोणत्याही अपेक्षेशिवाय, अनेकदा स्वतःच्या वेळेचा, पैशाचा आणि कुटुंबाच्या वेळेचा त्याग करून पक्षासाठी झटत असतात. मात्र, आजची वस्तुस्थिती वेगळी चित्र दाखवते.

मोठी बातमी! घरगणनेच्या काळातच शिक्षकांची ‘टीईटी’; २१ जूनला होणार शिक्षक पात्रता परीक्षा; २७ मार्च ते १६ एप्रिलपर्यंत करता येणार अर्ज

खऱ्या अर्थाने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना बाजूला सारून, केवळ चापलुसी करणाऱ्या आणि 'होयबा' संस्कृतीला खतपाणी घालणाऱ्या व्यक्तींना महत्त्वाची पदं दिली जात आहेत. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. ज्यांनी वर्षानुवर्षे पक्षासाठी घाम गाळला, त्यांनाच आज दुर्लक्षित केलं जातंय, ही वेदना शब्दात मांडणं कठीण आहे. पक्षाचा अल्पसंख्याक सेल आणि त्या माध्यमातून जोडलेला समाज, जो एकेकाळी पक्षाचा मजबूत आधारस्तंभ होता, आज पूर्णपणे उपेक्षित वाटतो आहे. संवादाचा अभाव, नेतृत्वाची अनुपस्थिती आणि ठोस कार्यक्रमांची कमतरता यामुळे अल्पसंख्याक समाजात पक्षाबद्दलची बांधिलकी कमकुवत होत चालली असल्याचे त्यांनी सांगितले.



सलीम सारंग म्हणाले की, हा केवळ संघटनात्मक मुद्दा नाही, तर समाजाच्या विश्वासाचा प्रश्न आहे. पक्षाने या घटकाकडे दुर्लक्ष केल्यास, त्याचे दूरगामी परिणाम होणार हे स्पष्ट आहे. मग प्रश्न पडतो, हा दुर्लक्षाचा भाग आहे की जाणूनबुजून घेतलेली भूमिका? अलीकडील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनी पक्षातील कमकुवत दुवे उघडकेले. राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद स्तरावर पक्षाचा निकाल घसरलेला स्पष्ट दिसतो. भिवंडीसारख्या मुस्लिम बहुल भागात जिल्हाध्यक्ष म्हणून अल्पसंख्याक समाजातील सक्षम नेतृत्व देण्याऐवजी बाहेरील आणि असंबंधित व्यक्तींना जबाबदारी दिली जाते, ही चूक नाही का?


नवी मुंबई, मीरा-भाईंदर, मुंबई, सोलापूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये अशीच परिस्थिती आहे. स्थानिक वास्तव समजून न घेता घेतलेले निर्णय पक्षाच्या मुळावर घाव घालत आहेत. याहूनही गंभीर बाब म्हणजे काही नेत्यांकडे तीन-तीन, चार-चार पदे आहेत. मात्र त्या पदांचा उपयोग पक्षवाढीसाठी न होता केवळ स्वतःची प्रतिष्ठा मिरवण्यासाठीच केला जातो. पक्षाला बळकटी देण्याऐवजी ही पदांची मक्तेदारी पक्षाला कमकुवत करत आहे, मग या अपयशाची नैतिक जबाबदारी अशा निष्क्रिय नेत्यांनी स्वीकारू नये का? त्यांनी राजीनामे दिले तर नव्या नेतृत्वाला संधी मिळेल आणि ते पक्षासाठी फायद्याचं असेल, असं त्यांनी सांगितलं.

ऐनवेळी पायलट का बदलले? मुंबईत CCTVमध्ये काय दिसलं? अजितदादांच्या अपघात प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी सगळंच सांगितंल

ते म्हणाले की, पक्षात दीर्घकाळ कार्यरत असलेल्या जुन्या आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून, बाहेरून येणाऱ्या आणि पक्षाशी कुठलाही संबंध नसलेल्या व्यक्तींना पदांची खैरात केली जात आहे. इतकेच नव्हे, तर इतर पक्षांतून आलेले लोकच आम्हाला आमच्या पक्षाची विचारधारा शिकवू लागले आहेत. हा निष्ठावंत कार्यकर्त्यांवर झालेला उघड अन्याय आहे. आज परिस्थिती अशी आहे की अनेक आमदारांना स्वतःच्या मतदारसंघातील नगरसेवकही निवडून आणता येत नाहीत. या सगळ्या परिस्थितीमध्ये सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो तो म्हणजे या हाराकिरीची जबाबदारी कोणाची?

कर्नाटकला अधिकारच नाही, ही तर महाराष्ट्राची मानहानी; अजित पवार अपघात प्रकरणी FIR वर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं

प्रत्येक वेळी पराभवाचं खापर तळागाळातील कार्यकर्त्यांवर फोडणं सोपं असतं. पण धोरणात्मक चुका, चुकीचे निर्णय, आणि संघटनात्मक दुर्लक्ष यासाठी वरिष्ठ पातळीवर आत्मपरीक्षण होणं गरजेचं आहे. नेतृत्वाने केवळ आदेश देणं पुरेसं नाही, तर कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभं राहणं, त्यांच्या भावना समजून घेणं आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेणं ही त्यांची जबाबदारी आहे. कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेऊन काम करणारी पार्टीच भविष्यात कार्यकर्ते व जनतेसाठी सुरक्षित आणि सक्षम पर्याय म्हणून उभी राहील, असं सलीम सारंग यांनी सांगितले आहे.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.