भारताचे टी-२० विश्वकरंडक विजेतेपद राखण्याचे स्वप्न पूर्ण झाल्यानंतर आता २०२७मधील एकदिवसीय विश्वकरंडकाच्या दिशेने पाऊल टाकण्यात येणार आहे. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी आयपीएलच्या अखेरीस एकदिवसीय विश्वकरंडकाचा आराखडा तयार असेल, असे स्पष्ट करीत याबाबतचे संकेत दिले आहेत. टी-२० विश्वकरंडकाचे जेतेपद सलग दुसऱ्यांदा पटकावल्यानंतर भारताच्या एकदिवसीय संघात बदल होतील का, असा प्रश्न या वेळी उभा ठाकला आहे. भारतीय संघात प्रवेश करण्यासाठी प्रचंड रस्सीखेच दिसून येत असताना श्रेयस अय्यर, के. एल. राहुल व रिषभ पंत या तीन खेळाडूंसाठी आयपीएलचा मोसम अत्यंत महत्त्वाचा व निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.


भारतीय क्रिकेट संघाने १९८३नंतर २०११मध्ये एकदिवसीय विश्वकरंडक पटकावला. त्या घटनेला आता १५ वर्षे उलटून गेली. २०२७पर्यंत १६ वर्षे झालेली असतील. या दरम्यान तीन एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धा पार पडल्या. मात्र भारताला एकदाही एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धा जिंकता आलेली नाही. एकदिवसीय विश्वकरंडकाच्या जेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी भारताचा पुरुष संघ प्रयत्नांची शिकस्त करताना दिसेल यात शंका नाही.


भारतीय एकदिवसीय क्रिकेट संघाचे नेतृत्व सध्या तरी शुभमन गिल याच्याकडे आहे. तसेच मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी गौतम गंभीरकडे आहे. आयपीएल संपल्यानंतर एकदिवसीय विश्वकरंडकाच्या मैदानातील तयारीला वेग येईल. भारतीय संघाने संयुक्त अरब अमिरातीमधील चॅम्पियन्स करंडकाचे जेतेपद पटकावत आपले वर्चस्व प्रस्थापित केले. मात्र त्यानंतर झालेल्या तीन एकदिवसीय मालिकांपैकी दोन मालिकांमध्ये भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय संघाला २-१ अशा फरकाने हार सहन करावी लागली. त्यानंतर दक्षिण आफ्रिकन संघाला मायदेशात २-१ असे पराभूत केले खरे, मात्र न्यूझीलंडकडून मायदेशातच २-१ अशी पराभवाची नामुष्की ओढवली.


भारतीय संघ टी-२० प्रकारात संस्मरणीय कामगिरी करीत असला तरी गेल्या काही महिन्यांत कसोटी व एकदिवसीय प्रकारात उल्लेखनीय खेळ करताना दिसत नाही. एकदिवसीय विश्वकरंडकासाठी २० खेळाडूंकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे, असेही सांगण्यात आले आहे. याचा अर्थ २० खेळाडू डोळ्यांसमोर ठेवून योजना आखली जाणार आहे. अर्थात २०२७पर्यंत मोठी दुखापत किंवा वाढलेला सुमार फॉर्म याचा अडथळा आला नाही, तर हेच २० खेळाडू पुढे जाऊ शकणार आहेत.


क्रिकेटचा एकदिवसीय प्रकार म्हटला तर सध्या तरी विराट कोहली व रोहित शर्मा हे अनुभवी खेळाडू संघामध्ये कायम आहेत. कारण हे दोघेही फक्त हाच प्रकार खेळत आहेत. इतर दोन प्रकारांमधून दोघांनी निवृत्ती पत्करली आहे. शुभमन गिल कर्णधार असल्यामुळे तोही संघात कायम आहे. हे तीनही खेळाडू वरच्या क्रमांकावर खेळताना दिसतात. या तीन जागा निश्चित आहेत. अर्थात आगामी काळातील फलंदाजी फॉर्म व तंदुरुस्तीही लक्षात घेतली जाईल, हा भाग वेगळा आहे.

T20 World Cup Final March 8 India : ध्वज विजयाचा उंच धरा रे!

आता मधल्या फळीकडे वळू या. श्रेयस अय्यर, के. एल. राहुल या दोन खेळाडूंना एकदिवसीय प्रकारात मधल्या फळीत संधी देण्यात येते. या दोघांकडूनही चॅम्पियन्स करंडकात छान कामगिरी करण्यात आलेली आहे. आता प्रश्न असा आहे, की २०२७मधील विश्वकरंडकापर्यंत दोघांना आपला फलंदाजी फॉर्म टिकवावा लागणार आहे. कारण भारतीय संघामध्ये प्रवेश करण्यासाठी कमालीची चुरस दिसून येत आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत आयुष बदोनी, यशस्वी जयस्वाल आणि ध्रुव जुरेल या फलंदाजांचाही समावेश करण्यात आला होता. मात्र त्यांना संधी मिळाली नाही.


टी-२० विश्वकरंडकासाठी भारतीय संघाचा सदस्य असलेले तिलक वर्मा, रिंकू सिंग हेदेखील मधल्या फळीत फलंदाजी करू शकणार आहेत. तसेच ॠतुराज गायकवाडही शर्यतीत आहे. शिवाय आगामी आयपीएल हंगामातही ठसा उमटवून काही खेळाडू पुढे येऊ शकणार आहेत. त्यामुळे श्रेयस अय्यर व के. एल. राहुल या दोघांनाही सजग राहावे लागणार आहे. श्रेयस अय्यरने आतापर्यंत एकदिवसीय प्रकारात ७६ सामन्यांमधून पाच शतके व २३ अर्धशतकांसह २,९७७ धावा फटकावल्या आहेत. त्याची सरासरी ४६.५१ अशी राहिलेली आहे. के. एल. राहुलनेही एकदिवसीय प्रकारात देदीप्यमान कामगिरी केलेली आहे. त्याने ९४ सामन्यांमधून आठ शतके आणि २० अर्धशतकांसह ३,३६० धावा फटकावल्या आहेत. त्याने चक्क ५०.९०च्या सरासरीने धावांची लूट केलेली आहे. या दोनही खेळाडूंनी आपल्या कारकीर्दीत संघाला गरज असताना मोलाची खेळी साकारली आहे. दोनही खेळाडूंना चढ-उतारांमधून जावे लागले आहे. आता एकदिवसीय विश्वकरंडकात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी त्यांना आगामी काळात सातत्यपूर्ण कामगिरी करणे गरजेचे असणार आहे.


यष्टीरक्षणासाठी झुंज


सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेट संघाने मायदेशात टी-२० विश्वकरंडक जिंकताना ऐतिहासिक खेळाचा नजराणा पेश केला. संजू सॅमसन याने अखेरच्या तीन लढतींमध्ये अर्धशतकी खेळी साकारत विजयात मोलाचा वाटा उचलला. ईशान किशन यानेही निर्णायक लढतींमध्ये चमक दाखवत आपली निवड सार्थ ठरवली. आता एकदिवसीय विश्वकरंडकासाठी भारतीय संघामध्ये या दोनही नावांचा विचार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. के. एल. राहुल हा यष्टीरक्षक फलंदाज संघात कायम आहे. मात्र पर्यायी यष्टीरक्षक फलंदाज म्हणून कोणता खेळाडू संघात असेल याचे उत्तर आगामी काळात मिळू शकणार आहे.


मेहनतीला पर्याय नाही


एक काळ असा होता, की रिषभ पंत भारताचा अव्वल दर्जाचा यष्टीरक्षक फलंदाज होता. रिषभ पंत जीवघेण्या कार अपघातातून थोडक्यात बचावला. या अपघातातून पूर्णपणे बरा होण्यासाठी त्याने सर्वस्व पणाला लावले. त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर पुनरागमनही केले. पण फलंदाजीचा फॉर्म त्याला काही गवसेना. यंदाची आयपीएल ही टी-२० स्पर्धा त्याच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे. लखनौ सुपरजायंट्स या संघाचा कर्णधार म्हणून तो जबाबदारी पार पाडणार आहे. तसेच तो तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची शक्यताही निर्माण झाली आहे. या वेळी त्याला लढा द्यावा लागणार आहे. कारण यष्टीरक्षक फलंदाज म्हणून संघामध्ये प्रवेश करण्याची चढाओढ सुरू असताना रिषभ पंतला आपली चुणूक दाखवावी लागणार आहे. सध्या भारताच्या टी-२० संघातून तो बाहेर फेकला गेला आहे. एकदिवसीय विश्वकरंडकासाठी भारतीय संघाचे तिकीट बुक करण्यासाठी त्याला मेहनत घ्यावी लागेल एवढे मात्र निश्चित आहे. आयपीएल सुरू असतानाचे पुढील दोन महिने श्रेयस अय्यर, के. एल. राहुल व रिषभ पंत या तीन खेळाडूंसाठी निर्णायक ठरणार आहेत. याशिवाय आयपीएलमधून काही युवा क्रिकेटपटू विश्वकरंडक खेळण्यासाठी दारं ठोठावू शकतात, त्यांच्याकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.