पुणे - मतदारयादी अचूक आणि अद्ययावत ठेवण्यासाठी मृत मतदारांची नावे वगळण्याची मोहीम जिल्हा प्रशासनाने सुरू केली आहे. या मोहिमेंतर्गत बारामती तालुक्यातून आतापर्यंत साडेसहा हजार मृत मतदारांची नावे मतदारयादीतून कमी केली.


जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये मोहीम सुरू केली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदारयादी शुद्ध करण्यावर प्रशासनाने विशेष भर दिला आहे. तलाठी आणि ग्रामसेवकांच्या माध्यमातून अर्ज ७ भरून मृत व्यक्तींची नावे यादीतून कमी केली जात आहेत. येत्या काही दिवसांत आणखी मोठ्या प्रमाणावर मृत मतदारांची नावे वगळली जाण्याची शक्यता आहे.


दरम्यान, कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास संबंधितांनी ऑनलाइन अर्ज ७ भरून मृत व्यक्तीचे नाव वगळावे, असे आवाहन निवडणूक विभागाच्या अधिकारी मीनल कळसकर यांनी केले आहे. शिवाय मतदार पुनरीक्षण मोहिमेंतर्गत घरभेटी, माहिती संकलन आणि नोंदी अद्ययावत करण्याचे काम जिल्हा प्रशासनाकडून सुरू आहे.


जिल्ह्यात सध्या ९१ लाख ५९ हजार ५१८ मतदार नोंदणीकृत असून, मतदार पुनरीक्षणाचे काम जिल्हा प्रशासनाकडून सुरू आहे. आतापर्यंत सुमारे २५ टक्के मॅपिंगचे काम पूर्ण झाले असून, उर्वरित काम टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.