नांदेड : जिल्ह्यातील विष्णुपुरी परिसरातील ग्रामीण तंत्रनिकेतन महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या 19 वर्षीय विद्यार्थिनीचा मृतदेह वसतिगृहात गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. या घटनेमुळं एकच खळबळ उडाली आहे. बुधवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. सानिका खांडरे असे मृत तरुणीचे नाव असून ती हिमायतनगर तालुक्यातील वाघी येथील रहिवासी होती.
सानिका ही ग्रामीण तंत्रनिकेतन महाविद्यालयात इलेक्ट्रॉनिक अँड टेलीकम्युनिकेश शाखेच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत होती. विशेष म्हणजे तिचा भाऊ देखील त्याच वर्गात शिक्षण घेत असल्याची माहिती आहे. महाविद्यालयात सध्या अंतर्गत परीक्षा सुरू आहेत. बुधवारी सकाळी 8 ते 9.30 या वेळेत सानिकाचा पेपर होता. ती पेपर पूर्ण केल्यानंतर आपल्या हॉस्टेलच्या मैत्रिणीसोबत वसतिगृहात गेली होती. आपल्या काकांना फोन करून “पेपर चांगला गेला” अशी माहिती सानिकानं दिल्याचं समोर आलं आहे. त्यानंतर ती आपल्या रूममधील मैत्रिणीसोबत काही वेळ फिरायला गेली.
थोड्या वेळानंतर मैत्रिणी जेवण करण्यासाठी गेल्या आणि काही वेळाने परत आल्यानंतर त्यांना सानिकाचा मृतदेह वसतिगृहात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. ही घटना लक्षात येताच महाविद्यालय परिसरात एकच गोंधळ उडाला. घटनेची माहिती मिळताच महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी मृतदेह खाली उतरवून शासकीय रुग्णालयात नेले. पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
सानिका ही अत्यंत हुशार आणि अभ्यासू विद्यार्थिनी म्हणून ओळखली जात होती. अभियंता होण्याचे तिचे स्वप्न होते. तिच्या अचानक मृत्यूमुळे मित्र-मैत्रिणींसह महाविद्यालयातील शिक्षकांमध्येही हळहळ व्यक्त केली जात आहे.
या घटनेनंतर नातेवाईकांनी महाविद्यालय प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. घटना घडल्यानंतर ही कुटुंबीयांना माहिती देण्यात आली नाही असा आरोप त्यांनी केला आहे. तसेच नातेवाईकांना कळवण्यापूर्वीच महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी मृतदेह खाली उतरवून रुग्णालयात हलविल्याचा आरोपही करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणात संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, सानिका खांडरे हिच्या आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. ग्रामीण पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरु केला आहे. आहे. या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या वस्तीगृहातील विद्यार्थांच्या सुरक्षतेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.