- रविंद्र गायकवाड


बिडकीन - शासकीय रुग्णालयात मोफत होणाऱ्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय बजरंग दळवी (वय ५८) व सफाई कर्मचारी नारायण हरिश्चंद्र ब्राह्मणे (वय-३७) यांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे बिडकीनसह परिसरात एकच खळबळ उडाली आहे.


तक्रारदार (वय-३७) यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या बहिणीच्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी ५ एप्रिल रोजी ग्रामीण रुग्णालय बिडकीन येथे संपर्क साधण्यात आला होता. यावेळी संबंधित शस्त्रक्रिया शासकीय योजनेतून मोफत असतानाही डॉ. दळवी यांनी सुरुवातीला तब्बल ६ हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. लाच देण्यास नकार देत तक्रारदाराने ६ एप्रिल रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, छत्रपती संभाजीनगर येथे तक्रार दाखल केली.


तक्रारीची पडताळणी पंचासमक्ष करण्यात आली असता, डॉ. दळवी यांनी १२०० रुपयांवर ‘तडजोड’ करत ही रक्कम त्यांच्या वतीने सफाई कर्मचारी नारायण ब्राह्मणे याच्याकडे देण्यास सांगितल्याचे निष्पन्न झाले.


यानंतर पथकाने नियोजनबद्ध सापळा रचला. तक्रारदाराकडून देण्यात आलेली १२०० रुपयांची लाच स्वीकारताना नारायण ब्राह्मणे याला रंगेहाथ पकडण्यात आले. त्यानंतर मुख्य आरोपी डॉ. दळवी यांनाही शोधून ताब्यात घेण्यात आले.


कारवाईदरम्यान आरोपींकडून लाच रक्कम जप्त करण्यात आली असून मोबाईल फोनही ताब्यात घेण्यात आले आहेत. संबंधितांच्या घरझडतीची प्रक्रिया सुरू असून अधिक तपास सुरू आहे. या प्रकरणी बिडकीन पोलिस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.


ही कारवाई पोलीस निरीक्षक योगेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. पोलीस अधीक्षक माधुरी केदार कांगणे, अपर पोलीस अधीक्षक शशिकांत सिंगारे आणि उपअधीक्षक राजीव तळेकर यांनी मार्गदर्शन केले. पथकात पोलीस हवालदार इंगळे व युवराज हिवाळे यांचा समावेश होता.


दरम्यान, या घटनेमुळे ग्रामीण रुग्णालयातील कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. शासकीय सेवा मोफत असताना लाच मागितल्याने आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत होत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.


लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही शासकीय कामासाठी कायदेशीर शुल्काव्यतिरिक्त लाच मागितल्यास त्वरित तक्रार करावी. यासाठी टोल फ्री क्रमांक १०६४ व व्हॉट्सॲप क्रमांक ७७२०८९१०६४ उपलब्ध आहे.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.