बुलढाणा जिल्ह्यात हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. धाड येथे आज घडलेल्या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे. एकाच कुटुंबातील आईसह चार मुलांना विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. या घटनेच तीन लहानग्या बहीण-भावांचा मृत्यू झाला आहे. सध्या आई व एक चिमुकलीवर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे संपूर्ण धाड परिसरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

विषबाधा झाल्यामुळे 3 चिमुकल्यांचा मृत्यू

समोर आलेल्या माहितीनुसार धाड येथील अफरीन मोहंमद वसीम जमदार (वय 34) यांच्यासह त्यांच्या 4 मुलांना विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. या दुर्दैवी घटनेत मोहंमद अली मोहंमद वसीम जमदार (वय 4), मशिरा मोहंमद वसीम जमदार (वय 7) आणि फातिमा मोहंमद वसीम जमदार (वय 8) या तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर आई अफरीन आणि मुलगी अश्मिरा वसीम जमदार (वय 3 ) यांच्यावर बुलढाणा येथील वेगवेगळ्या खासगी रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. सर्वजन या दोघींच्या प्रकृतीत सुधारणेची प्रार्थना करत आहेत.

कुटुंबातील सदस्यांना पोटदुखी, मळमळ व उलट्यांचा त्रास

रविवारपासून या कुटुंबातील सदस्यांना पोटदुखी, मळमळ व उलट्यांचा त्रास सुरू झाला होता. आज सकाळी प्रकृती अधिक बिघडल्याने सर्वांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान अली व मशिरा यांचा मृत्यू झाला.
आई अफरीन यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना, फातिमा व अश्मिरावर बालरोगतज्ज्ञांकडे उपचार करण्यात येत होते. सायंकाळी सुमारास फातिमा हिचाही मृत्यू झाला.

अन्नातून विषबाधा झाल्याचा संशय

सध्या अश्मिराची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. प्राथमिक माहितीनुसार, अन्नातून विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. या दुर्दैवी घटनेमुळे धाड परिसरात शोककळा पसरली आहे. दरम्यान, अन्न-पाणी किंवा इतर पदार्थांमधून या कुटुंबाला विषबाधा झाली असण्याची शक्यता आहे. त्यामुळे नेहमी डॉक्टरांकडून शिळे आणि उघड्यावरचे अन्न खाणे टाळण्याचा सल्ला दिला जातो. तसेच स्वच्छ पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.