- नरेंद्र साठे
पुणे - वाढते प्रदूषण रोखण्यासाठी आणि ई-वाहनांना चालना देण्यासाठी जिल्ह्यात इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन तयार करण्यात येणार आहेत. या ठिकाणांना ऊर्जा उपाययोजनांसह ‘अक्षय ऊर्जा मॉडेल केंद्र’ करण्यावर या आर्थिक वर्षात जिल्हा परिषद भर देणार आहे. या उपक्रमामुळे पुणे जिल्हा शाश्वत ऊर्जेच्या वापरामध्ये रोल मॉडेल ठरणार आहे.
जिल्हा परिषदेच्या योजनेअंतर्गत उभारण्यात येणारी चार्जिंग स्टेशन केवळ वाहन चार्जिंगपुरती मर्यादित न राहता, त्यांना ‘मॉडेल अक्षय ऊर्जा हब’ म्हणून विकसित करण्यात येणार आहे. या केंद्रांमध्ये चार्जिंगसाठी लागणारी वीज सौरऊर्जा आणि बायोगॅससारख्या पर्यावरणपूरक स्रोतांमधून निर्माण केली जाणार आहे. त्यामुळे पारंपरिक विजेवरील अवलंबित्व कमी होऊन ऊर्जा बचतीसह पर्यावरण संरक्षणालाही चालना मिळणार आहे.
जिल्ह्यातील महामार्ग, शहरी भाग तसेच वर्दळीच्या ग्रामीण ठिकाणांची निवड करून ही केंद्रे उभा करण्याचे नियोजन आहे. यामुळे ईव्ही वापरणाऱ्या नागरिकांना सुलभ आणि जलद चार्जिंग सुविधा उपलब्ध होणार असून, इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरात वाढ होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा जिल्हा परिषद प्रशासनाला आहे.
विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाची संधी
नागरिक, स्थानिक स्वराज्य संस्था आणि विद्यार्थ्यांमध्ये अक्षय ऊर्जेबाबत जनजागृती केली जाणार आहे. ऊर्जा व्यवस्थापन, सौर तंत्रज्ञान आणि बायोगॅस प्रकल्पांविषयी प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्याची संधी विद्यार्थ्यांना येथे मिळणार आहे. दरम्यान, या प्रकल्पामुळे स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मितीलाही चालना मिळण्याची शक्यता आहे.
प्रकल्पाची वैशिष्ट्ये
मॉडेल केंद्रे ‘प्रात्यक्षिक केंद्र’ म्हणूनही कार्य करणार नागरिक आणि विद्यार्थ्यांमध्ये अक्षय ऊर्जेबाबत जनजागृती होणार
बायोगॅस प्रकल्पामुळे सातत्यपूर्ण ऊर्जा उपलब्ध होणार
जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पामध्ये ईव्ही चार्जिंग स्टेशन व अक्षय ऊर्जेवर भर
चार्जिंगसाठी सौरऊर्जा आणि बायोगॅसवर आधारित वीज निर्मितीचा वापर
महामार्ग, शहरी व वर्दळीच्या ठिकाणी धोरणात्मक पद्धतीने केंद्रांची उभारणी
नागरिक, संस्था व विद्यार्थ्यांसाठी प्रात्यक्षिक केंद्रांद्वारे जनजागृती व प्रशिक्षण
पहिल्या टप्प्यात दोन ठिकाणी ईव्ही चार्जिंग स्टेशन करण्याचा प्रस्ताव
सौर पॅनेलच्या माध्यमातून दिवसा वीज निर्मिती होईल पारंपरिक विजेवरील अवलंबित्व कमी होऊन ऊर्जा बचत होणार
स्वच्छ वाहतूक आणि शाश्वत ऊर्जा ही काळाची गरज आहे. या मॉडेल केंद्रांमुळे जिल्ह्यातील नागरिकांना फायदा होईल. पारंपरिक ऊर्जेला सक्षम, पर्यावरणपूरक पर्याय मिळेल.
- गजानन पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.