पुणे/ खळद - ‘पुणे जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी फ्रेंच आणि जर्मन भाषा अतिशय चांगल्या पद्धतीने बोलू लागले आहेत. अटल टिंकरिंग, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) प्रयोगशाळा केल्या आहेत. या ‘इंडस्ट्री ४.०’ शी संबंधित शंभर शाळांमध्ये प्रयोगशाळा आहेत. अतिशय सुंदर संकल्पना जिल्हा परिषदेने अस्तित्वात आणली. ही संकल्पना पुण्यापुरतीच मर्यादित न ठेवता, महाराष्ट्रातील इतरही जिल्हा परिषदेच्या शाळांपर्यंत घेऊन जाण्यासाठी प्रयत्न केले जातील,’’ अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी केली.


महात्मा फुले यांच्या नावाने एक हजार कौशल्य प्रशिक्षण केंद्रे उभी केली जातील, असेही फडणवीस यांनी सांगितले. पुरंदर तालुक्यातील खानवडीत ज्योती सावित्री जिल्हा परिषद शाळेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांना सुरवात झाली.


यावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, शिक्षणमंत्री दादा भुसे, कृषी मंत्री दत्तात्रेय भरणे, अल्पसंख्याक मंत्री अतुल सावे, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा आदी उपस्थित होते.


महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे मुख्य कार्य बहुजन समाजाला शिक्षित करणे हेच होते. त्याच विचारातून खानवडी येथे उभारलेली ही आधुनिक सीबीएसई शाळा ही त्यांच्या कार्याची पुढची पायरी आहे.


- छगन भुजबळ, अन्न व नागरी पुरवठा मंत्री

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.